तीन विद्यार्थिनींवर शिक्षकाचा लैंगिक अत्याचार, सुन्न करणारी घटना
(म.विजय)
यवतमाळ – उत्तर प्रदेशातील बालिकागृहात शेकडो विद्यार्थिनींवर बलात्कार आणि क्रूर अत्याचारांच्या घटनेने देश सुन्न झाला आहे. असाच एक प्रकार आता यवतमाळमध्ये उघडकीस येतो आहे. बाभूळगांव इथल्या आश्रमशाळेत शिकणाऱ्या ३ मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या तीनही मुलींनी शिक्षकानेच त्यांच्यावर अत्याचार केल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी विजय जाधव नावाच्या शिक्षकाला पोक्सो कायद्याअंतर्गत अटक केली आहे.
आर्थिक आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बाभूळगावमध्ये निवासी आश्रमशाळा चालवली जाते. इथल्या एका विद्यार्थिनीवर विजयने लैंगिक अत्याचार केले. घडल्या प्रकाराची कुठे वाच्यता केलीस तर ओल्या काठीने फोडून काढेन अशी धमकी जाधवने तिला दिली होती. मात्र तरीही हिम्मत एकवटत पिडीत विद्यार्थिनीने हा प्रकार महिला अधीक्षकांना सांगितला. ही मुलगी पुढे आलेली पाहताच आणखी दोन मुलींनी धीर एकवटला आणि महिला अधीक्षकांकडे विजय जाधवने आपलाही लैंगिक छळ केल्याची तक्रार केली. प्रकरणाचं गांभीर्य ओळखत अधीक्षकांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार नोंदवली.
पिडीत मुलींमधली एक मुलगी ही आठवीत शिकणारी आहे तर बाकीच्या दोघी नववीत शिकणाऱ्या आहेत.