तांत्रिक गडबडीमुळे आधारकार्ड कामात अडचणी ; डोंबिवलीत टोकनसाठी भल्या मोठ्या रांगा
डोंबिवली – आधारकार्ड काढण्यासाठी महापालिका विभागीय कार्यालयात सकाळपासून नागरिक लांबलचक रांगेत उभे राहूनही पुन्हा खाली हात परत जावे लागत आहे. जरी आधारकार्ड केंद्र पुन्हा सुरु करण्यात आले असले तरीही नको त्या कटकटी डोके वर काढत आहेत.
आधारकेंद्र सुरु, पुन्हा बंद आणि पुन्हा सुरु अशा बिकट त्रासाला डोंबिवलीकरानां सामोरे जावे लागत आहे. आधारकार्डसाठी टोकन पद्धत सुरु कल्याने उन्हात रांगेत उभे राहावे लागत आहे. मुख्य म्हणजे जरी रांगेत उभे राहूनही आधारकार्ड मिळेल याची खात्री मिळत नाही. आधारकार्ड केंद्रात फक्त दोन संगणकांच्या माध्यमातून काम सूरु आहे. परंतु या कामात तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. दिवसाला एका संगणकाच्या माध्यामतून ४० तर दुसऱ्या संगणकाच्या माध्यमातून २५ आधारकार्ड देता येतात असे तेथील कर्मचारी सांगत आहेत. मुळात साधन सामुग्री तांत्रिकदुष्ट्या बरोबर नसल्याने संगणकात बिघाड होऊन कामात व्यत्यय येत आहे. अशा परिस्थितीमुळे टोकन मिळूनही आधारकार्ड मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. याबाबत आधारकार्ड केंद्रातील कर्मचारी आम्ही हतबल आहोत असे सांगतात. अशा परिस्थितीमुळे नागरिकांची मात्र ससेहोलपट होत आहे. रांगेत उभे राहूनही आधारकार्ड मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरत आहे. यामुळे आधारकार्ड केंद्रात संगणकांची संख्या वाढवावी अशी मागणी जोर धरत आहे. याबाबत डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख तथा सभागृहनेते राजेश मोरे म्हणाले कि, चांगल्या दर्जाचे संगणक आधार केंद्रात वापरले जावे जेणेकरून याचा त्रास नागरिकांना होणार नाही. जर याकडे लक्ष दिले नाही तर मात्र कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नगरीकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.