…तर आमच्या पद्धतीने कारवाई असा थेट इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला

अधिकृत फेरीवाल्यांना जागा दिल्यानंतर संबंधित भागातील अवैध फेरीवाले हटवले पाहिजेत. महापालिका या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास असमर्थ असेल तर आम्हाला आमच्या पद्धतीने कारवाई करावी लागेल, असा थेट इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पालिका आयुक्त अजय मेहता यांना पत्राद्वारे दिला आहे.

फेरीवाला धोरणाच्या पार्श्वभूमीवर मनसेचे दादर वि भागप्रमुख यशवंत किल्लेदार आणि कार्यकर्त्यांनी राज यांचे पत्र घेऊन आयुक्तांची भेट घेतली. ‘पालिकेने काही दिवसांपूर्वी बोरिवली ते चेंबूर पट्ट्यात फेरीवाल्यांना बसण्यासाठी जागा नेमून दिल्या असून फेरीवाले या व्यवस्थेला एक शिस्त आणि आकार देण्याचा हा प्रयत्न चांगला असला तरी हे करताना फेरीवाला धोरणातील महाराष्ट्राच्या अधिवासाच्या मुद्द्याकडे अजिबात दुर्लक्ष होता कामा नये. सरकारच्या नियमानुसार अधिवास नियमाची काटेकोर अंमलबजावणी व्हायला हवी, फेरीवाला धोरण निश्चितीकरण ज्या धीम्या गतीने सुरू आहे, ते पाहता या प्रक्रियेस खूपच दप्तर दिरंगाई होताना दिसत आहे. त्यामुळे ही प्रक्रिया अधिक जलद गतीने होणे आवश्यक आहे, असे राज यांनी म्हटले आहे.

‘कुणावरही अन्याय होणार नाही’

अधिकृत फेरीवाल्यांची निश्चिती झाल्यावर एकही अवैध फेरीवाला आढळणार नाही, याची दक्षता पालिकेने घ्यायला हवी आणि तसे न झाल्यास संबंधित अधिकाऱ्याला ताबडतोब बडतर्फ करायला हवे. अधिकृत फेरीवाल्यांसाठी जागा निश्चिती करताना त्यांना सध्याच्या जागेपासून तीन मीटर अंतरावरच जागा वाटप करावी. त्यामुळे मोक्याच्या जागांसाठी होणारे गैरव्यवहार तात्काळ थांबतील, असे या पत्रात स्पष्ट नमूद केले आहे. या पत्रावर आयुक्तांनी अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली जाईल, कोणावरही अन्याय होणार नाही, असे स्पष्ट केल्याची माहिती किल्लेदार यांनी दिली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email