तरुणांच्या धाडसामुळे २० ऊसतोड मजुरांचे प्राण वाचले !पेटत्या ट्रकमधून सर्वाना बाहर काढले

गेवराई – ऊस तोडणी आटोपूल्याने ऊसतोड मजुरांना घेऊन गावाकडे परतणारा ट्रकला चकलांबाजवळ अचानक आग लागली. ट्रक पेटताच चालकाने उडी मारून पळ काढला, मात्र मजुरांच्या आराडाओरड्याने धावून आलेल्या तरुणांनी आगीत झेप घेत ट्रकमधील मजुरांना आणि जनावरांना बाहेर काढलं. ट्रकचा स्फोट होऊ नये म्हणून एका तरुणानं हा ट्रक शेजारीच असलेल्या तलावात घुसवला आणि साऱ्यांचे प्राण वाचवले.

गेवराई तालुक्यातील चकलांबा जवळ असणाऱ्या कासारवाडी येथील २० मजुरांना घेऊन परतणाऱ्या ट्रकने अचानक पेट घेतला. चालक ट्रक सोडून पळाला, घाबरलेल्या मजुरांनी आरडाओरड सुरू केली. या गोंधळाने चकलांबा ग्रामस्थ घटनास्थळाकडे धावले काही तरुणांनी जीवाची बाजी लावून पेटलेल्या ट्रक वर चढत ट्रक मध्ये असलेल्या ऊस तोड मजुरांची सुटका केली. यात काही महिला आणि बालकांचा समावेश होता, एवढेच नव्हे तर जनावरंही बाहेर काढली. संपूर्ण पेटलेल्या ट्रकच्या डिझेल टाकीचा केव्हाही स्फोट होऊ शकेल या भीतीनं शिंदे नावाच्या एका तरुणानं ट्रक चालू केला आणि जवळच असलेल्या तळ्याच्या पाण्यात घुसवला, पाण्यात ट्रक घुसवल्याने पुढचा मोठा अनर्थ टळला.

ग्रामस्थाच्या सतर्कतेने आणि तरुणांच्या धाडसाने तब्बल २० ऊस तोड मजुरांचे प्राण वाचले, ही घटना मध्यरात्री दीड वाजता चकलाबा शिवारात घडली. मदतीसाठी धावून येणाऱ्या ग्रामस्थाचे जिल्हा भरातून आभार मानले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.