डोळ्यात मिरचीची पूड फेकून लुबाडले
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.०६ – कल्याण पूर्व कोलशेवाडी परिसरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागली असून लुट चोरी घरफोडी अशा गुन्ह्याचा आलेख वाढत चालला आहे .हि गुन्हेगारी रोखण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याचे दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच काल रात्रीच्या सुमारास एका तरुणाच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकत त्याला लुटल्याची घटना उघडकीस आली.
कल्याण पूर्वेकडील दुर्गा माता मंदिर लक्ष्मी बाग येथील रामशाम अपार्टमेंट मध्ये राहणारे बिपिनचंद्र तिवारी बुधवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास बिल्डींगचे गेट बंद करत असताना अचानक दोन इसम त्या ठिकाणी आले त्यांनी क्षणार्धात तिवारी यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकत त्यांच्या जवळील रोख रक्कम व मोबाईल असा मिळून एकूण ३३ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी तिवारी यांनी कोलशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.