डोंबिवली निवासी भागातील नाले सफाई योग्य नसल्याने पाणी साठण्याची भिती
(श्रीराम कांदु)
डोंबिवली,ता १४ – डोंबिवली औद्योगिक विभागातील निवासी भागात असलेले नाले सफाई येाग्य पध्दतीने न झाल्याने मुसळधार पावसात सखल भाग असलेल्या परिसरात पुरसदृष्य स्थिती निर्माण होण्याची भिती असून या भागात शैक्षणिक संस्था असून याचा फटका विद्यार्थ्याना बसण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
या संदर्भात शिवसेनेचे कार्यकर्ते राजू नलावडे यांनी सांगीतले की एम आय डी सी मधील मध्यवर्ती अशा कावेरी स्वीट चौक जवळ असलेल्या मोठया नाल्यातील गाळ व जमलेला थर मानवी यंत्रणा किंवा जेसीबीने काढता आला असता मात्र ठेकेदाराने वरवर दिसणारा कचराव प्लास्टिक पिशव्या काढून साफ केल्याचा दावा केला आहे.मात्र भविष्यात मुसळधार पाऊस पडल्यास सखल असलेल्या भाग पाण्याखाली जाण्याची भिती त्यानी व्यक्त केली.यामुळे परिसरातील नागरिक घाबरले आहेत शिवाय या भागात शाळा-महाविद्यालये असून विद्यार्थ्याना याचा त्रास होण्याची भिती पालकांना वाटत आहे.या नाल्या व्यतिरिक्त उस्मा पेट्रोल पंप,सर्व्हिस रोड,डीएनस बँक या भागातील परिस्थितीही तशीच असल्याचे त्यानी सांगीतले.
नागरिकांनी सांगीतले की या भागातील गटारेही साफ झालेली नाहीत.या सर्व नाले सफाईची सक्षम यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी राजू नलावडे यांनी केली.