डोंबिवलीत शिवसेना उपशाखा प्रमुखावर हल्ला
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – डोंबिवली जवळील भोपर गावात मंगळवारी रात्रीच्या सुमारास भाजपा पदाधिकाऱ्यासह सहा जणांनी उपशाखाप्रमुख रवींद्र पाटील यांच्या घरात घुसून मारहाण केल्याची घटना घडली. तर रवींद्र पाटील हे चार ते पाच लोकांच्या समवेत पाणी प्रशनासंदर्भांत जाब विचारण्यासाठी आमच्या घरी आले असता त्यांनी आपल्याला शिवीगाळ व मारहाण केल्याची तक्रार केली आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी एकमेकांवर परस्परविरोधी तक्रार दाखल केली आहे. पाणी प्रश्नावरून हा प्रकार घडला आहे.
रविंद्र वसंत पाटील ( ४० ) असे जखमी झालेल्या उपशाखाप्रमुखाचे नाव असून त्यांना डोंबिवलीमधील एका खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ओळखीतल्या पाच ते सहा जणांच्या टोळक्याने घराचा दरवाजा ठोठावत मला बाहेर बोलावून वायर आणि ठोशाबुक्कीने बेदम मारहाण केली. घरातल्या लोकांनी आरडाओरडा केल्यामुळे मारेकरी निघून गेले असे रवींद्र पाटील यांनी केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. त्यानुसार संदीप माळी , अमर माळी , मिलिंद माळी , निलेश सावकार , प्रवीण माळी आणि मनोज देसले यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान अमर माळी यांच्या पत्नी रविना माळी या येथील भाजपाच्या स्थानिक नगरसेविका असल्याने भाजप विरुद्ध सेना पाणी प्रश्नावरून आमनेसामने आल्याचे समोर आले आहे. अमर माळी यांनी नोंदविलेल्या तक्रारीनुसार रवींद्र पाटील हे चार ते पाच लोकांच्या समवेत पाणी प्रश्नाबाबत जाब विचारण्यासाठी आमच्या घरी आले असता त्यांनी आपल्याला शिवीगाळ व मारहाण केली असल्याचे नमूद केले आहे. या तक्ररीनुसार रवींद्र पाटील , सुनीता पाटील आणि सतीश माळी यांच्याविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहे.