डोंबिवलीत पैसे वसूलीच्या वादातून व्यावसायिकाच्या घरावर अंदाधुंद गोळीबार

श्रीराम कांदु 
पैसे वसूलीच्या वादातून एका व्यवसायिकाच्या  घरावर अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना शनिवारी रात्री डोंबिवलीत घडली. सुदैवाने या गोळीबारात व्यावसायिक  आणि त्याच्या घरातील कुणीही जखमी झाले नाही. मात्र या घटनेमुळे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखली जाणारी डोंबिवली नगरी सातत्याने होणाऱ्या गुन्हेगारी कारवायांमुळे बदनाम होऊ लागली आहे.
डोंबिवलीजवळच्या भोपर रोडला नांदिवली गाव आहे. या गावात व्यावसायिक गीतेश पाटील कुुटुंबासह राहतात. त्यांचा  व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी दिव्याजवळच्या आगासन गावात राहणाऱ्या महेंद्र खोत यांना त्यांनी व्याजाने साडेतीन लाख रुपये दिले होते. मात्र वारंवार मागणी करूनही व्याज तर नाहीच, पण मुद्दलही परत देण्यास खोत हा टाळाटाळ करत होता. अखेर शनिवारी रात्री पाटील यांनी खोत याला फोन करून दिलेले पैसे परत मागितले. मात्र खोत याने त्यांना दमदाटी केली. त्यानंतर महेंद्र खोत याच्यासह तेजू मुंडे, निलेश मुंडे आणि त्यांचे २०  ते २५  साथीदार मध्यरात्री १२.३० ते १ च्या दरम्यान नांदिवली गावात घुसले. वेगवेगळ्या वाहनांतून आलेल्या या टोळक्याने गीतेश पाटील यांच्या घरावर हल्ला चढविला. घराला असलेल्या खिडकीच्या काचा फोडून त्यातून घरात गोळीबारही करण्यात आला. मात्र सुदैवाने ही गोळी चुकविल्याने गीतेश पाटील हे थोडक्यात बचावले. या प्रकाराची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. या संदर्भात गीतेश पाटील यांनी दिलेल्या माहितीवजा जबानीवरून ठाण्यात जाऊन तशी फिर्याद दाखल करण्यात आली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. मात्र त्याचे नाव सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. विशेष म्हणजे गीतेश पाटील राहत असलेल्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हल्लेखोर हल्ला केल्यानंतर पळून जाताना सीसीटीव्हीतही कैद झाले आहे. डोंबिवलीतील गेल्या सात-आठ  महिन्यांपासून वारंवार गोळीबाराच्या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email