डोंबिवलीत पूर्वेकडील स्कायवॉकवर गर्दुल्यांचा वावर
[ अनधिकृत फेरीवाल्यांसह गर्दुल्यांकडे होत आहे कानाडोळा ]
डोंबिवली दि.२० – कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने करोडो रूपये खर्ची करून पूर्व-पश्चिम रेल्वेस्थानक दरम्यान स्कायवॉक निर्मिती केली. करदाते नागरिक आणि रेल्वे प्रवासी यांना याचा फायदा होणे हा उद्देश होता. परंतु येथील वस्तुस्थिती मात्र वेगळी असून या स्कायवॉकवर अनधिकृत फेरीवाले आणि गर्दुल्यांनी ताबा घेलता आहे. पालिकेचे फेरीवाले अतिक्रमण विरोधी पथक या गोष्टींकडे कानाडोळा करीत आहे. कल्याण येथील स्कायवॉकवर गर्दुल्यांनी नागरिकांना मारहाण केल्याची घटना घडली असून त्या घटनेची पुनरावृत्ती डोंबिवलीत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाला अगदी लागुनच स्कायवॉक आहे. पूर्वेकडील इंदिरा चौकातील डाव्या-उजव्या बाजूला स्कायवॉकवर जाण्यासाठी असलेले प्रवेशद्वार फेरीवाल्यांनी काबीज केले आहे. त्याचप्रमाणे मधुबन चित्रपटगृह आणि काँग्रेस कार्यालय येथील प्रवेशद्वारेही त्यांनी काबीज केली आहेत. अशाच पद्धतीने स्कायवॉकचे सगळेच उपरस्ते फेरीवाल्यांनी गिळंकृत केले आहेत. यापेक्षाही अजब बाब म्हणजे स्कायवॉकच्या मध्यभागी गर्दुल्यांच्या टोळक्यांचा मोठ्या प्रमाणात वावर सुरु आहे. काही गर्दुल्यांनी स्कायवॉकवर संसार थाटला असून त्यांना कोणाचीही भीती वाटत नाही.
गर्दुल्याचा वावर कोणत्या थराला जाऊ शकतो याचा अनेक घटना कल्याण-डोंबिवलीत झाल्या आहेत. पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज बालोद्यान मध्येही गर्दुल्यांनी सामान्य नागरिकांवर हल्ला केला होता. कल्याण मधील रेल्वे भोगद्यात गर्गुल्यांनी एका तरुणावर वार करून त्याची हत्या केली होती. डोंबिवलीत गर्दुले रात्रीच्या वेळी नागरिकांची लुटमार करतात अशा अनेक तक्रारीही आहेत. असे असूनही डोंबिवलीतील स्कायवॉक आणि रेल्वे फलाट गर्दुल्यांना आंदण दिले जात आहेत याची खंत व्यक्त होत आहे. रात्रीच्या वेळी या स्कायवॉकवर अनेक गैरप्रकार होत असून रेल्वे पोलीस कशासाठी हा सामन्यांचा प्रश्न आहे. हा स्कायवॉक कोणाच्या ताब्यात यावरूनही वादंग असून ‘ग’ आणि ‘फ’ प्रभागक्षेत्र अधिकारी याबाबत बोलायला तयार नाहीत. पालिकेचे फेरीवाले अतिक्रमण विरोधी पथक कामचलाऊ कामगिरी करीत असून ते गर्दुल्यांचा वावराबाबत दुर्लक्ष करीत असल्यामुळे डोंबिवलीकर आश्चर्य व्यक्त करीत आहेत.