डोंबिवलीत द्रौपदी नंतर नागुबाई इमारत खचली; ७२ कुटुंबे बेघर

 

 – डोबिवली पश्चिमेकडील इमारतीला शुक्रवारी रात्रीच्या सुमारास तडे गेल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी तात्काळ इमारती बाहेर धाव घेतली. त्यानंतर शनिवारी ही धोकादायक इमारत जमीनदोस्त करणार असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.


कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात यापूर्वी बांधण्यात आलेल्या अवैध इमारती धोक्याच्या उंबरठ्यावर येऊन उभ्या ठाकल्या आहेत. याच इमारतींपैकी डोंबिवली पश्चिमेतील नागुबाई सदन इमारतीचा मागील भाग शुक्रवारी रात्रीच्या सुमारास खचला. त्यामुळे इमारतीमध्ये राहणारी तब्बल ७२ कुटुंबे एका रात्रीत बेघर झाली आहेत. गेल्याच वर्षी त्याच इमारती शेजारी असलेली द्रौपदी सदन नामक इमारत अशाच प्रकारे खचली होती. त्यावेळीही २३ कुटुंबे रस्त्यावर आली होती.

जवळपास ३२ वर्षांपूर्वी म्हणजे १०८३ मध्ये मालक भरत तुकाराम जोशी यांनी सदर तळ + ४ मजली इमारत बांधली आहे. सदर इमारतीमध्ये तब्बल ७२ कुटुंबे पागडी व भाडेकरारावर राहत आहेत. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास इमारतीच्या मागचा कॉलम खचल्याचे लक्षात आले. त्यामुळे एल टाईप असलेल्या या इमारतीच्या जिन्याचा भागाला तडे जावू लागले. त्यामुळे पोलीस आणि महापालिकेने तातडीने घटनास्थळी धाव घेवून संपूर्ण इमारतीमधील रहिवाशांनी इमारती बाहेर काढले.

गेल्या ३२ वर्षात या इमारतीची एकदाच दुरूस्ती करण्यात आल्याची माहिती तेथील रहिवाशांनी दिली. मात्र, इमारत फार जुनी नसल्याने ती धोकादायक नव्हती असे तेथील रहिवाशांचे म्हणणे आहे. तर पालिकेने सदर इमारत धोकादायक असल्याचे जाहीर केले असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. या इमारतीच्या मागील कॉलम खचला असून त्यातील स्टील वाकून सिमेंट-रेतीचे डेब्रिज बाहेर पडू लागले. त्यामुळे एल टाईप इमारतीचा अर्धा भाग पूर्णपणे धोकादायक झाला आहे. या इमारतीच्या शेजारी एक इमारत आणि दुसऱ्या बाजूला बैठी चाळ आहे. इमारतीचा धोकादायक भाग कोणत्याही क्षणी कोसळण्याचा धोका असून त्यामुळे बाजूच्या इमारती आणि चाळीला सुद्धा धोका निर्माण होवू शकतो, अशी भिती स्ट्रक्चर ऑडीटर नयन ढोलकिया यांनी यावेळी व्यक्त केली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email