डोंबिवलीत ठीक ठिकाणी डेब्रिज आणि कचऱ्याचे ढिगारे
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – स्वच्छतेबाबत कल्याण डोंबिवली परिक्षेत्रात पालिका प्रशासनाचे धाबे दणाणले असल्याने स्वच्छतेसाठी विविध योजनांची आखणी पालिका प्रशासन करत आहे. परतू असे असूनसुद्धा रस्त्यावर पडलेले डेब्रिज उचलण्याचा पुरता बोऱ्या वाजला आहे. औद्योगिक विभागात तसेच रस्तोरस्ती डेब्रिजचा खच असल्याचे चित्र पाहायल मिळत आहे. कचऱ्याचाही प्रश्न तसाच आहे. प्रभागात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग असल्याने नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले आहे.
डोंबिवली शहराचा विचार केला तर पूर्व-पश्चिम आणि औद्योगिक विभाग आणि जोडीला ती २७ गावे स्वच्छतेबाबत करदात्या नागरिकांची ओरड असून त्याचा त्रास तेथील लोकप्रतिनिधीना होत आहे. रस्त्यात खड्डे आणि त्याच्या जोडीला कचरा यामुळे होणारी दुर्गंधी असे चित्र बहुतेक प्रभागात असल्याचे खुद्द लोकप्रतिनिधीचे म्हणणे आहे. २७ गाव तसेच शहरी प्रभागांची स्थिती सारखीच आहे. स्वच्छतेसाठी कचरा कुंड्या हद्दपार करण्यात आल्या असल्या तरी आता रस्त्यावरच कचऱ्याचे ढीग आणि त्यावर भटक्या श्वानांची वर्दळ अशी स्थिती डोंबिवली पश्चिम विभागात दिसून येते. औद्योगिक विभागातील पंजाब नॅशनल बँक जवळ असणाऱ्या सिटी मॉल परिसरात कचऱ्याचे साम्राज्य दिसते.रस्त्यालगत बेधडक डेब्रिज टाकले जात असून ते वेळेवर उचलले जात नाही रस्त्याच्या आजुबाजुला डेब्रिजचे ढिगारे झाले आहेत. मुख्य म्हणजे गृहनिर्माण वसाहतीतील घरे,इमारती, बंगले यांची दुरूस्ती-देखभाल झाल्यानंतर त्यामुळे निमार्ण होणारे डेब्रिज, कचरा कोठेही टाकण्यात येतो. अशा प्रकारचे डेब्रिज ‘आॅन कॉल’ उचलण्याचा निर्णय घेतला. स्वतंत्र मोबाईल क्रमांक देऊन विनाशुल्क डेब्रिज उचलण्यासाठी ‘आॅन कॉल’ ही सुविधा सुरू करण्यात आली. कॉल केल्यास तत्काळ डेब्रिज उचलला जातो असा दावा प्रशासन अधिका-यांकडून केला गेला. पण वस्तुस्थिती वेगळी असल्याचे चित्र दिसत आहे. पालिका प्रशासन स्वच्छतेसाठी डोळ्यावर लावलेली झापड कधी दूर करणार हा खरा प्रश्न आहे.