डोंबिवलीकरांची पावलं थिरकणार‘डोंबिवली रासरंग २०१८’च्या तालावर
(श्रीराम कांदु)
खा. डॉ. श्रीकांत शिंदे आयोजित सर्वात मोठा दांडिया फेस्टिवल
· कर्तृत्ववान महिलांचा ‘नवदुर्गा’ पुरस्काराने सन्मान
· फेस्टिवलचे दुसरे वर्ष
· गतवर्षी १ लाखांहून अधिक लोकांचा सहभाग
डोंबिवली : कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने, सांस्कृतिक शहर अशी आपली ओळख कायम ठेवत आपल्या सांस्कृतिक परंपरेच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवण्यासाठी डोंबिवली शहर सज्ज झाले असून डोंबिवलीकरांची पावलं ‘डोंबिवली रासरंग २०१८’च्या तालावर उद्या, १० ऑक्टोबरपासून पुन्हा थिरकणार आहेत. १० ते १७ ऑक्टोबर असे आठ दिवस डोंबिवली पूर्व येथील डी.एन.सी. शाळेच्या प्रांगणात डोंबिवलीतील हा सर्वात मोठा दांडिया फेस्टिवल रंगणार आहे.
विविध परंपरा उत्सव तरुणाईच्या जल्लोषात साजरा करणाऱ्या डोंबिवली शहराच्या परंपरेला साजेसा असा ‘डोंबिवली रासरंग’ हा दांडिया फेस्टिवल खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गतवर्षी पहिल्यांदा आयोजित केला होता. पहिल्याच वर्षी तब्बल १ लाखाहून अधिक लोक दांडियाच्या जल्लोषात सहभागी झाले होते. केवळ डोंबिवलीच नव्हे तर अंबरनाथपासून ठाण्यापर्यंतची तरुणाई या दांडियात सहभागी झाली होती.
यंदा देखील दांडिया फेम मनीषा सावला यांची धम्माल गाणी आणि बिपिनचंद्र चुनावाला यांच्यासह पार्थ गांधी, सिद्धेश जाधव, वाचा बिपिन आदींच्या गाण्यांच्या तालावर नवरात्रीचे नऊ दिवस उत्साहपूर्ण वातावरणात डोंबिवलीकर थिरकणार असून हिंदी, मराठी, गुजराती मालिका चित्रपटांतील सुप्रसिद्ध कलाकार ‘डोंबिवली रासरंग २०१८’ कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. या सोहळ्यात स्त्रियांसाठी मराठमोळ्या संस्कृतीने बहरलेला भोंडला हा खेळ खेळला जाणार असून विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या डोंबिवलीतील कर्तृत्ववान महिलांचा नवदुर्गा पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या उपक्रमाला जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, आमदार सुभाष भोईर, महापौर विनिता राणे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे, रमेश म्हात्रे, दीपेश म्हात्रे, महिला संघटक कविता गावंड, तालुकाप्रमुख एकनाथ पाटील, प्रकाश म्हात्रे, भाऊसाहेब चौधरी आदींचे सहकार्य लाभले आहे.
या दांडिया उपक्रमात महिलांसाठी, कुटुंबासाठी वेगळे विभाग असणार आहेत. प्रत्येक दिवशी उत्कृष्ट दांडिया खेळणाऱ्यांना विशेष पारितोषिकेही देण्यात येणार असल्याचे डॉ. शिंदे म्हणाले.
डोंबिवलीकरांची रसिकता आणि इथल्या तरुणाईची सळसळती उर्जा गेल्यावर्षी प्रमाणेच यंदाही ‘रासरंग’ उपक्रमाला यशस्वी करेल, असा विश्वास खा. डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला. डोंबिवली शहराने आपली सांस्कृतिक ओळख नेहमीच जपली आहे. इथल्या तरुणाईने या शहराला तरुण ठेवण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. गुढीपाडव्याची शोभायात्रा असू देत किंवा गणेशोत्सव, प्रत्येक उत्सव साजरा करताना डोंबिवलीकरांनी आपली संस्कृती जपत जल्लोषाची परंपरा नेहमीच जपली आहे. ‘डोंबिवली रासरंग २०१८’ हा नऊ दिवस चालणारा दांडिया महोत्सव उत्साहाची हीच उत्सवी परंपरा कायम ठेवणार आहे. हा दांडिया महोत्सव हा डोंबिवलीकरांचा आपला महोत्सव असून डोंबिवलीकर नागरिकांनी आणि तरुणाईने यात मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहनही खा. डॉ. शिंदे यांनी केले.