डीजेच्या दणदणाटाला प्रतिबंध हवाच…

(शेखर जोशी)

डीजे न वाजवण्याचा, स्पीकरच्या भींती उभ्या न करण्याचा सुबुद्धपणा गणेशोत्सव मंडळे दाखवतील, आपणहून याचे पालन करतील अशी अपेक्षा करणेही व्यर्थ आहे. आगमन मिरवणुकीत कानठळ्या बसवणारा आणि छातीत धडकी भरवणारा दणदणाट होताच. निदान विसर्जन मिरवणुकीच्या वेळी तरी दणदणाट होणार नाही याची स्थानिक महापालिका प्रशासन, पोलीस यांनी खबरदारी घ्यावी.

दणदणाट करणा-या गणेशोत्सव मंडळांना त्यांच्या छातीत धडकी भरेल असा दंड ठोठवून तो वसूल करावा. तसेच या मंडळांना पुढच्या वर्षी गणेशोत्सवासाठी परवानगी देऊ नये. सगळ्यात महत्वाचे म्हणजे महापालिका, पोलीस आणि अन्य संबंधित शासकीय यंत्रणांच्या अधिका-यांना यासाठी जबाबदार ठरवून त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी.

दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले असले तरी पाच, सात आणि अनंत चतुर्दशी बाकी आहे. कोल्हापूर येथे विश्वास नांगरे-पाटील हे थांबवू शकतात तर मुंबई, ठाणे, डोंबिवली परिसरातील पोलिसांना या बंदीची कठोरपणे अंमलबजावणी का करता येत नाही?

जाता जाता- अनधिकृत बांधकामाला संरक्षण दिले तर नगरसेवक, आमदार, खासदार यांना अपात्र ठरवण्याची सोय आहे. तोच नियम येथे लागू करावा. ज्या प्रभागात असा दणदणाट सुरु राहील त्या प्रभागाचा नगरसेवक आणि अन्य लोकप्रतिनिधी यांना अपात्र केले जावे. अशी एक-दोन उदाहरणे जरी झाली तरी या दणदणाटाला काही प्रमाणात वचक बसेल. असे प्रकारे जिथे घडतील त्या गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिका-यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जावा.

Leave a Reply

Your email address will not be published.