डिसेंबर २०१८ अखेरपर्यन्त राज्यात १०० टक्के विद्युतीकरण ; वीजपुरवठा नसलेल्या नागरिकांनी सौभाग्य योजनेचा लाभ घ्यावा

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना “सौभाग्य” या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ दि. २५ सप्टेंबर २०१७    रोजी केला. या योजनेंतर्गत महावितरणच्यावतीने दि. ३१ डिसेंबर २०१८ पर्यन्त विद्युतीकरण न झालेल्या कुटुंबांना वीज देऊन राज्यात १०० टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे. राज्यात प्रत्येक घरात वीज पोहचावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे सातत्याने प्रयत्नशील असून त्यांच्या निर्देशानुसार महावितरणच्यावतीने सौभाग्य योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

सौभाग्य योजनेत शहरी व ग्रामीण भागातील विद्युतीकरण न झालेल्या घरांना वीजजोडणी देण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांना ही वीजजोडणी विनाशुल्क देण्यात येणार असून इतर लाभार्थ्यांना मात्र ५०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. हे ५०० रुपये संबंधित लाभार्थ्यांने त्याच्या बिलातून १० टप्प्यात भरावयाचे आहेत. मोफत वीजजोडणीसाठी लाभार्थी कुटुंबांची पात्रता २०११ च्या सामाजिक, आर्थिक जातीच्या जनगणनेच्या आधारे निश्चित करण्यात येणार आहे. योजनेत वीजपुरवठा प्राप्त झालेल्या ग्राहकांना मासिक वीजबील भरणे बंधनकारक आहे. मात्र थकबाकीमुळे कायमचा वीजपुरवठा खंडित झालेले घरे, तात्पुरत्या शिबीरामधील स्थलांतरित होऊ शकणारी घरे तसेच शेतांमधील घरे या योजनेस पात्र ठरणार नाहीत.

या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरातील अंतर्गत वायरिंगसह एक चार्जिंग पॉईट, एक एलईडी दिवा मोफत देण्यात येणार आहे. तसेच अतिदुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणी पारंपारिक विद्युतीकरण करणे शक्य नाही अशा घरांना सौरऊर्जा संचामार्फत वीजपुरवठा देण्यात येणार आहे. या ठिकाणी अंतर्गत वायरिंगसह एक डीसी पंखा, पाच एलईडी दिवे आणि एक डीसी चार्जिंग पॉईंट मोफत देण्यात येणार आहे. पंतप्रधान आवास योजना, शबरी योजना, रमाई योजना, आदीम योजना व इतर योजनेतून तयार झालेल्या घरांनासुध्दा मोफत वीजपुरवठा देण्यात येणार आहे.

सौभाग्य योजनेंतर्गत महाराष्ट्रात आतापर्यन्त झालेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे ११लाख ६४ हजार १३५लाभार्थ्याना वीजपुरवठा देण्याचे उद्दिष्ट असून यापैकी ७ लाख ६७हजार ९३९ लाभार्थ्यांना पारंपारिक पध्दतीने तर २१ हजार ५६लाभार्थ्यांना अपारंपारिक पध्दतीने वीजपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच दारिद्रयरेषेखालील घरे व सौभाग्य योजनेत पात्र घरांना पूर्वी मंजूर झालेल्या पंडीत दिनदयाल ग्राम ज्योती योजनेंतर्गत राज्यातील ३ लाख ९६ हजार १९६ घरांना वीजजोडण्या देण्याचे काम सुरू आहे.

राज्यात वीजपुरवठा नसलेल्या नागरिकांनी सौभाग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या नजिकच्या कार्यालयाशी त्वरीत संपर्क साधावा किंवा 18002003435 / 18002333435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email