ठाण्यामध्ये २० आणि २१ जानेवारीला अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलनाचं आयोजन

ठाण्यामध्ये २० आणि २१ जानेवारीला अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलनाचं आयोजन

ठाण्यामध्ये प्रथमच कार्टूनिस्ट कंबाईन्सतर्फे अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. एका पत्रकार परिषदेत या संमेलनाचे अध्यक्ष विवेक मेहेत्रे यांनी ही माहिती दिली. या व्यंगचित्रकार संमेलनाचं उद्घाटन २० जानेवारीला पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. २० जानेवारीला विद्यार्थी आणि महिलांसाठी व्यंगचित्र कार्यशाळा, नामवंत व्यंगचित्रकारांची प्रात्यक्षिकं आणि गप्पा, सोशल मिडीया आणि व्यंगचित्र यावर परिसंवाद, तुमचं व्यंगचित्र तुमच्यासमोर अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. २१ जानेवारीला शालेय विद्यार्थ्यांसाठी व्यंगचित्र कार्यशाळा, सर्व वयोगटासाठी व्यंगचित्र कार्यशाळा, आमच्यासारखे आम्हीच या अंतर्गत व्यंगचित्रकारांच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे मराठी दैनिकांचे संपादक व्यंगचित्रापासून दूर का, यावर एक परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यात अनेक नामवंत संपादक सहभागी होणार असल्याचं मेहेत्रे यांनी सांगितलं. संमेलनाच्या दोन दिवसाच्या निमित्तानं देशभरातील नामवंत व्यंगचित्रकार आणि त्यांच्या व्यंगचित्रांचं एक प्रदर्शनही आयोजित करण्यात आलं असल्याचं मेहेत्रे यांनी सांगितलं. या संमेलनात प्रभाकर झळके यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवलं जाणार आहे. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हेही प्रदर्शनाला भेट देणार आहेत. नव व्यंगचित्रकारांच्या स्पर्धेमधील पारितोषिक विजेत्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पारितोषिकं प्रदान केली जाणार आहेत. या स्पर्धेमध्ये ७३ नव व्यंगचित्रकारांनी सहभाग घेतला होता. त्यातील ६ व्यंगचित्रांची निवड करण्यात आली असून त्यापैकी ३ जणांना राज ठाकरेंच्या हस्ते पारितोषिकं दिली जातील असं विवेक मेहेत्रे यांनी सांगितलं. या प्रदर्शनामध्ये १९५२ ते १९५८ दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या फटकारे मध्ये नसलेली ठाकरे यांची रंगीत व्यंगचित्रं या प्रदर्शनात पहायला मिळणार असल्याचंही विवेक मेहेत्रे यांनी सांगितलं.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email