ठाण्यात घंटागाडी कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन

 (म.विजय)
ठाणे – ठाणे शहरातील घंटागाडी कर्मचार्‍यांनी आगाऊ उचल घेतलेली नसतानाही त्यांच्या वेतनातून कपात केली जात असल्याने संतापलेल्या घंटागाडी कर्मचार्‍यांनी अचानक कामबंद आंदोलन केले. त्यामुळे वर्तक नगर , रायलादेवी आणि मानपाडा प्रभाग समित्यांच्या परीक्षेत्रातील कचरा उचलला गेला नाही. दरम्यान, वेतनामधील हा अन्याय दूर न झाल्यास सबंध शहरातील घंटागाडी कर्मचारी रस्त्यावर उतरुन काम बंद आंदोलन करतील, असा इशारा घंटागाडी कामगारांचे नेते महेंद्र हिवराळे यांनी दिला आहे.
ठाणे महानगर पालिकेच्या अखत्यारीत असलेल्या अ गट घंटागाडी कर्मचार्‍यांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. या कर्मचार्‍यांसाठी गणवेश देण्यासाठी पालिकेने सदर ठेकेदाराला निधी अदा केला आहे. मात्र, त्या निधीनुसार गेले पाच वर्षात वेतनच दिले गेले नव्हते. त्यावरुन तसेच किमान वेतनावरुन कर्मचार्‍यांनी न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. असे असतानाच गेल्या दोन महिन्यांपासून कामगारांनी उचल घेतलेली नसतानाही त्यांच्या पगारातून ठराविक रक्कम कापली जात होती. मागील महिन्यात या संदर्भात संघटनेने पत्रव्यवहारही केला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करुन या महिन्यात २१ तारखेला वेतन अदा करुन त्यातून ठराविक रक्कम कापण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या कर्मचार्‍यांनी गुरुवारी सकाळी अचानक कामबंद आंदोलन केले. एम.कुमार या ठेकेदाराकडे काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन केल्यामुळे वर्तक नगर , रायलादेवी आणि मानपाडा या भागातील कचरा उचलण्यात आला नाही. दरम्यान, जर हा प्रश्न मार्गी लावला नाही तर उद्यापासून हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा महेंद्र हिवराळे यांनी दिला आहे.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email