ठाणे महानगरपालिकेच्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांना ठाणे स्मार्ट सिटी संचालक मंडळाची मंजुरी
( म विजय )
ठाणे (30): ठाणे स्मार्ट सिटी संच तिस-या बैठकीत नाले विकास प्रकल्प,मलःनिसारण, खाडी किनारा संवर्धन आणि सुशोभिकरण, पादचा-यांसाठी विशेषमैदान येथील भूमिगत वाहनतळ आणि नवीन रेल्वे स्टेशन आदी सर्व महत्वाकांक्षी प्रकल्पांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती महापौर सौ. मिनाक्षी राजेंद्र शिंदे आणि महापालिका आयुक्त(अतिरिक्त कार्यभार) तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
महसूल विभागाचे प्रधान सचिव तथा ठाणे स्मार्ट सिटीचे अध्यक्ष मनुकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला महापौर सौ. मिनाक्षी राजेंद्र शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के, विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील, महापालिका आयुक्त(अतिरिक्त कार्यभार) तथा स्मार्ट सिटी लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील चव्हाण, अतिरिक्त पोलिस आयुक्त सत्यनारायण, नगर अभियंता अनिल पाटील, मुखय लेखा व वित्त अधिकारी सुधीर नाकाडी आदी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये नाले विकास विस्तारीत प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. यामध्ये ठाणे शहरातील क्षेत्र आधारित विकास योजनेतंर्गत (एरिया बेस्ड डेव्हलपमेंट) 4010 मीटरचे आरसीसी नाले बांधणे आणि 150 मीटर लांबीचे कल्व्हर्ट बांधण्याच्या एकूण 49.22 कोटी रूपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर ठाणे शहरातील क्षेत्र आधारित विकास योजनेतंर्गत सर्वांगिन मलःनिसारण यंत्रणा निर्माण करण्यासाठीही संचालक मंडळाने मान्यता दिली. या प्रकल्पातंर्गत शहरामध्ये 24.90 कोटी रुपये खर्च करून सर्वांगिन मलःनिसारण प्रकल्पाच्या उभारणीकरिता निविदा मागविण्यासाठी संचालक मंडळाने मान्यता दिली.
शहराच्या सौंदर्यामध्ये भर घालणारा आणि विकासाचा नवा अध्याय म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते त्या खाडी किनारा संवर्धन आणि सुशोभिकरण प्रकल्पालाही या बैठक मान्यता देण्यात आली. यामध्ये साकेत बाळकुमसाठी 25 कोटी, कळवा ते शास्त्रीनगरसाठी 6.5 कोटी, कोलशेतसाठी 25 कोटी, नागला बंदरसाठी 50 कोटी, कावेसर वाघबिळसाठी 30 कोटी, पारसिक रेतीबंदर चौपाटीसाठी 70 कोटी असे एकूण 206.5 कोटी रूपयांच्या खाडी किनारा संवर्धन आणि सुशोभिकरण प्रकल्पाला मान्यता देण्यात आली.
ठाणे शहराच्या मध्यवर्ती असणा-या तीन हात नाका परिसर सुधारणा प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी तज्ञ सल्लागार नियुकत करण्यास संचालक मंडळाने मान्यता दिलीय एकूण 299 कोटी रूपयांच्या या महत्वकांक्षी योजनेमुळे तीन हात नाका येथील वाहतूक कोंडीवर परिणामकारक उपाययोजना होणार आहे. त्याचप्रमाणे मानसिक उपचार रूग्णालयाच्या जागोवर नवीन रेल्वे स्टेशन उभारण्याच्या प्रस्तावासही या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली. एकूण 119.32 कोटी रूपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी आरोग्य विभागाक़ून जागा महापालिकेस हस्तातंरित करून तातडीने प्रयत्न करण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आली.
तलावांचे शहर ही ठाण्याची ओळख अधिक समृद्ध करण्याच्यादृष्टीने मासुंदा तलाव, हरियाली तलाव, कमल तलाव संवर्धन आणि सुशोभिकरणाच्या 7.10 कोटी रूपयांच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली.
दरम्यान ठाणे स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट नसलेल्या पाणी पुरवठा योजनेस उपयुक्त ठरणा-या स्काडा या संगणकीकृत प्रणाली राबविण्याच्या प्रस्तावाबरोबरच गोवदेवी मैदान येथे भूमिगत पार्किंग सुविधा निर्माण करणे आणि कंमांड आणि कंट्रोल सेंटर या प्रकल्पांचा समावेश करण्याची अनुमती संचालक मंडळाने दिली.