ठाणे पोलीसांनी गेल्या दोन दिवसात जवळपास तीन कोटी ४० लाखांच्या चलनातून बाद झालेल्या नोटा पकडल्या
( श्रीराम कांदु )
ठाणे पोलीसांनी गेल्या दोन दिवसात दोन वेगवेगळ्या घटनेत मिळून जवळपास तीन कोटी ४० लाखांच्या चलनातून बाद झालेल्या नोटा पकडल्या आहेत. ठाणे पोलीसांनी सोमवारी त्यांना मिळालेल्या माहितीनुसार एका व्यक्तीला १ कोटी ४० लाखांच्या चलनातून बाद झालेल्या नोटा घेऊन जाताना पकडलं. पोलीसांना एक व्यक्ती चलनातून बाद झालेल्या नोटा मोठ्या प्रमाणावर एसयुव्ही मधून घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी सापळा रचला होता. हरिनिवास सर्कलजवळ पोलीसांनी मिळालेल्या माहितीनुसार एका गाडीला अडवलं. त्यावेळी गाडीत चार जण होतं. त्यापैकी तीन जण फरार झाले तर उमेश शिर्सेकर नावाच्या व्यक्तीला पोलीसांनी अटक केली. त्याच्या झडतीमध्ये त्याच्या गाडीत ५०० रूपयांच्या ९० लाखांच्या तर १ हजार रूपयांच्या ५० लाखांच्या नोटा मिळाल्या. पोलीसांनी या नोटा जप्त केल्या असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. दुस-या एका घटनेत १ कोटी ९९ लाखांच्या चलनातून बाद झालेल्या नोटा पोलीसांनी पकडल्या आहेत. आज सकाळच्या सुमारास स्कोडा गाडीतून नोटा घेऊन जाणा-या ५ जणांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली.