ठाणे जिल्हा परिषदेच्या महाराष्ट्र विकास सेवेतील अधिकाऱ्यांनी केले काम बंद आंदोलन
ठाणे – महाराष्ट्र विकास सेवेतील अधिका-यांना धमकावणे, शिविगाळ करणे, धक्काबुक्की करणे, मारहाण करणे बेकायदेशीर, अनियमित कामे करण्यासाठी दबाव आणणे, आत्महत्या करण्याच्या धमक्या देणे, बेकायदेशीर जमाव कार्यालयामध्ये आणून गोंधळ घालणे, मारहाणीच्या, तोंडाला काळे फासण्याच्या धमक्या देणे,कुटुंबियांना धमक्या देणे असे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याच्या निषेधार्त सोमवारी ठाणे जिल्हा परिषदेच्या महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार , ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक महेश पाटील , अप्पर जिल्हाधिकारी अनिल पवार यांना लेखी निवेदन देवून काम बंद आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी , प्रकल्प संचालक, सर्व उप मुख्य कार्यकारी अधिकारी , गट विकास अधिकारी , सहाय्यक गट विकास अधिकारी आदी अधिकारीवर्ग सहभागी झाले होते. २२ फेब्रुवारी रोजी पंचायत समिती, परंडा येथील गट विकास अधिकारी यांना बेमालूमपणे रस्त्यावर मारहाण करण्यात आली होती. अशाच घटना महाराष्ट्रातील उदगीर, हिंगोली, मंठा, परभणी, चाळीसगांव, औरंगाबाद, यवतमाळ, कळंब, रिसोड, मोताळा, धुळे, गेवराई येथे घडल्या आहेत.या सगळ्या घटनांचा वेळोवेळी निषेध करुन निवेदने दिली असताना शासनाने अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नसल्याची खंत संघटनेने व्यक्त करून राज्यातील विकास सेवेतील अधिकारी तणावपुर्ण आणि भितीच्या वातावरणाखाली काम करीत असल्याने संरक्षण देण्याच्या दृष्टीने प्रत्येक अधिका-यास एक शस्त्रधारी अंगरक्षक पोलीस देण्याची मागणीही करण्यात आली.