ठाणे जिल्हा परिषदेचा २०१८-१९ चा मूळ अर्थसंकल्प सादर
ग्रामीण विकासाला गती देणारा अर्थसंकल्प – जि.प.अध्यक्ष मंजुषा जाधव
ठाणे – ठाणे जिल्हा परिषदेचा २०१७ -१८ चा सुधारित आणि २०१८-१९ चा मूळ अर्थसंकल्प सोमवार दिनांक २६ मार्च २०१८ ची अर्थ समिती सभापती सुरेश म्हात्रे यांनी नियोजन भवन येथे सर्वसाधारण सभेत सादर करून बहुमताने मंजूर करण्यात आला. यावेळी जि.प. अध्यक्ष मंजुषा जाधव , उपाध्यक्ष सुभाष पवार , समाजकल्याण समिती सभापती निखील बरोरा , कृषी –पशु व दुग्धशाळा समिती सभापती उज्वला गुळवी , महिला व बाल कल्याण समिती सभापती दर्शना ठाकरे , मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र पाटील ,मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर ,उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( सा ) चंद्रकांत पवार उपस्थित होते.
ठाणे जिल्हाच्या ग्रामीण सर्वांगीण विकासाला गती देणारा यावर्षीचा अर्थसंकल्प असल्याचे अध्यक्ष महोदय यांनी सांगितले. ठाणे जिल्हा परिषदेने पंतप्रधान आवास योजना, हगणदारी मुक्त जिल्हा अभियान, झिरो पेंडंसी व गतीमान प्रशासन अशा शासनाच्या विविध योजनांमध्ये उत्तम कामगिरी करून अव्वल क्रमांक पटकावलेला आहे. त्याचप्रमाणे ग्रामिण जनतेचा सर्वसमावेशक विकास हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन हा स्वउत्पन्नाचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे.
सन 2018-19 साठी जिल्हा परिषदेचा महसुली खर्च व पाणी पुरवठा देखभाल दुरूस्तीसाठी प्रस्तावित खर्च तरतुदींसह एकूण रक्कम रू.77.70 कोटी (सत्त्याहत्तर कोटी सत्तर लक्ष) एवढा अर्थसंकल्पिय अंदाज आहे.
सदस्य होणार डिजिटल
सामान्य प्रशासन विभागांतर्गत जिल्हा परिषद प्रशासन सुरळीत चालण्याच्या दृष्टीने सर्व आवश्यक तरतूदी करण्यात आलेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांसाठी लॅपटॉप देण्याची नाविन्यपूर्ण योजना घेण्यात आलेली आहे.
ध्यास गुणवत्तेचा, विकास शाळांचा
जिल्हा परिषदेच्या 1337 शाळा आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीने विविध योजनांवर तरतुदी देण्यात आल्या आहेत. अध्ययन अक्षमता समजून घेऊन उपाययोजना करणे ही नविन योजना घेण्यात आली आहे. परिपूर्ण शाळा असाव्यात या उद्देशाने“ध्यास गुणवत्तेचा, विकास शाळांचा”नाविन्यपूर्णयोजना सादर करण्यात आलेली आहे.
आरोग्यात होणार जलद सुधारणा
आरोग्य विभागातील 3 प्राथमिक आरोग्य केंद्रे राष्ट्रीय गुणवत्ता हमी योजना पुरस्कृत असून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे परिपूर्ण बनविण्याच्या दृष्टीने विविध योजनांतर्गत तरतूदी करण्यात आलेल्या आहेत. आरोग्य विभागाच्या अथक प्रयत्नाने ठाणे जिल्ह्यात नवजात बालके व माता मृत्यु दरात मोठी घट झाली आहे. महिलांच्या आरोग्यासाठी सॅनीटरी नॅपकीन पुरविणे या योजनेसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच गरोदर मातांची सोनोग्राफी व प्रयोगशाळा चाचणी करणे या योजना घेण्यात आल्या आहेत.
विकास कृषी पशुसंवर्धन क्षेत्राचा
कृषी व पशुसंवर्धन अंतर्गत शेतकरी व पशुपालक यांच्या हिताच्या योजना घेण्यात आल्या आहेत. कृषी विभागांतर्गत बचतगटांना/ ग्रामसंघांना ऑजारे बँक (Tool Bank) देणे ही योजना यशस्वीरीत्या राबविणेत येत आहे. त्यासाठी सन 2018-19 करीता रू.1 कोटी तरतूद करण्यात आली आहे. कृषी औजारांचा पुरवठा व निविष्ठा पुरविणे यासाठी तरतूदी करण्यात आल्या आहेत. पशुसंवर्धन विभागांतर्गत सन 2018-19 साठी 50% अनुदानावर एक संकरीत गाय/म्हैस वाटप या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात तरतूद देण्यात आली आहे. तसेच जिल्हा स्तरीय पशु / पक्षी प्रदर्शन ही नवीन योजना घेण्यात आली आहे.
सामाजिक कल्याण
समाजकल्याण विभागांतर्गत विविध योजनांवर भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. उदा. मागासवर्गीय वस्तीसाठी जोडरस्ते बांधणे, मागासवर्गीय लाभार्थ्यांना डिस्को जॅकी (D.J.) पुरविणे,समाजमंदिरांमध्ये भांडी पुरविणे इ. तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी समाजमंदिरांमध्ये अभ्यासीका उपलब्ध करणे, समाजमंदिरामध्ये व्यायामशाळांसाठी साहित्य पुरविणे या नविन योजना घेण्यात आल्या आहेत.
एक पाऊल महिला सक्षमीकरणाकडे
महिला व बालकल्याण विभागांतर्गत सन2018-19 मध्ये रु.4.25 कोटी पेक्षा अधिक एवढी भरीव तरतूद करण्यात आली असून महिला लाभार्थ्यांच्या हितासाठी व्यापक प्रमाणात योजना घेण्यात आल्या आहेत.
किशोरवयीन मुलींसाठी तेजामयी
किशोरवयीन मुलींसाठी “तेजामयी” या योजने अंतर्गत जिवन कौशल्याचे प्रशिक्षण देणे व इतर व्यावसायीक व तांत्रिक प्रशिक्षणाच्या योजनांवर मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळांमधील किशोरवयीन मुलींना सॅनीटरी नॅपकीन पूरविणे या योजनेसाठी रु.30 लक्ष तरतूद करण्यात आली आहे.
अंगणवाड्या होणार परीपूर्ण
ठाणे जिल्हा परिषदेने अंगणवाडीना नवसंजीवनी देण्यासाठी परिपूर्ण अंगणवाडी हि योजना हाती घेतली असून यासाठी मोठी तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जिल्हा परिषद उत्पन्नाच्या ठराविकबाबींच्या 20% रक्कम पाणी पुरवठा, 20%रक्कम समाजकल्याण, व10% रक्कममहिला व बालकल्याण विभागासाठी राखीवठेवण्यात आलेली आहे. तसेच सन 2017-18 च्या सुधारित अर्थसंकल्पात सदर विभागांसाठी मागील अनुशेषासह तरतूद करण्यात आलेली आहे. अपंगांसाठी 3%रक्कम ठेवण्याची तरतूद असतानाही अपंगकल्याण योजनांसाठी जादा तरतूद ठेवण्यातआली आहे.
ठाणे जिल्हा परिषद ही सामान्य जनांचे हित जोपासणारी जिल्हा परिषद असून,जिल्हा परिषदेचा प्रत्येक सभापती, सदस्य,प्रत्येक अधिकारी व कर्मचारी हा जिल्हा परिषदेसाठी झटत आहे. ही जिल्हा परिषद जास्तीत जास्त लोकाभिमुख कशी होईल तसेच तळागाळातील बांधवांना योजनांचा लाभ मिळवून देण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केला जाणार असल्याचे अर्थ समिती सभापती सुरेश म्हात्रे यांनी सांगितले. यावेळी सभागृहात पंचायत समिती सभापती , जिल्हा परिषद सदस्य तसेच सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.