ठाणे ग्रामीण भागात संशयावरून हल्ला केल्याच्या घटना घडल्यास पोलीस कडक कारवाई करतील

(श्रीराम कांदु)

ठाणे दि.०३ – राज्यात मागील काही दिवसांपासून केवळ संशयावरून एखाद्यावर जमावाने हल्ला करण्याच्या घटना घडल्या आहेत. ठाणे ग्रामीण पोलीस हद्दीत अशा स्वरूपाच्या कुठल्याही अफवा पसरलेल्या नाहीत. कुठलाही समाज विघातक घटक कार्यरत नाहीत असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

अपर पोलीस अधीक्षक प्रशांत कदम यांनी सांगितले आहे की, जे काही समाजकंटक अफवा पसरविण्याचा प्रयत्न करतील किंवा कुठलाही संशय आला एवढ्या कारणास्तव जर कुण्या व्यक्तीने किंवा गटाने कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर पोलीस अशांवर अतिशय कठोर कारवाई करतील.

ठाणे ग्रामीण भागात पूर्णपणे शांतता असून पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे. कुठलीही लहान मुलं पळविणारी किंवा अशा स्वरुपाचे कृत्य करणारी टोळी या भागात अजिबात सक्रीय नाही.

ठाण्यातील नागरिक व ग्रामस्थ शांतताप्रेमी आणि समझदार आहेत त्यामुळे कुठल्याही गैरसमजाला बळी पडू नका असे आवाहन त्यांनी केले आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज यांचे आवाहन

मागील काही दिवसांपासून काही समाज कंटक सोशल मिडीयाच्या माध्यमातून “मुले चोरणारी टोळी आपल्या भागात आहे” अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहेत. या अफवांमुळे वाटसरु, प्रवासी व अन्य निष्पाप व्यक्तींचा छळ होतो. त्यामुळे मारहाणीच्या घटना देखील घडल्या आहेत.

कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हयातील नागरिकांना सूचित करण्यात येते की, सोशल मिडीयावरील कोणत्याही अफवांवर विश्वासू ठेवू नये. अफवा पसरविणा-या संशयीतांवर सायबर सेलची कडक नजर असून अशा व्यक्तींवर त्वरीत कार्यवाही करण्यात येईल. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीसांना सहकार्य करावे, अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास नजिकच्या पोलीस ठाण्यात संपर्क करावा, असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक (कोकण परिक्षेत्र ) नवल बजाज यांनी केले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email