ठाणेच्या रिक्षा संघटनांच्या कृती समितीने साधला प्रवाशांशी संवाद,

प्रवाशांच्या सोयीसाठी रिक्षास्टँड मर्यादीत करण्याची मागणी  – मर्यादेचे उल्लंघन करणाऱयांवर कारवाई करा 
अनावश्यक बॅरीकेट्स हटवा ,ठामपा आयुक्तांची भेट घेणार 

( म विजय )
ठाणे रेल्वे स्थानकानजीकच्या रिक्षा स्टँडला शिस्त लावण्यासाठी ठाणे महानगर पालिकेने अनेक बॅरीकेट्स टाकले आहेत. त्यामुळे येथील रिक्षांच्या सुमारे चार ते पाच रांगा तयार होत आहेत. पहिल्या रांगेत असणाऱया रिक्षाचालकांना प्रवाशी मिळत असले तरीही उर्वरित रांगांमधील रिक्षाचालकांचा व्यवसाय होत नाही. शिवाय, प्रवाशांनाही अनेक अडथळे दूर करत रिक्षा शोधाव्या लागत आहेत. परिणामी, अबालवृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ज्या चार – पाच रांगा करण्यात आल्या आहेत. त्यांची संख्या दोन करण्यात यावी, अशी मागणी रिक्षा संघटनांच्या कृती समितीने केली आहे.
ठाणे रेल्वे स्थानकाची उभारणी झाल्यानंतर 1853 साली घोडागाडी स्टँड आणि नंतर रिक्षा स्टँडची उभारणी करण्यात आली. या स्टँडला 1995 साली अधिकृत मान्यता देण्यात आली. आता या स्टँडची पुन:रर्चना करण्यात आली आहे. या स्टँडची पाहणी रिक्षा चालकांच्या कृती समितीचे नेते जितेंद्रकुमार इंदिसे यांनी, रिक्षा संघटनांचे पदाधिकारी लक्ष्मण दावणे (तात्या), हणमंत खाडे, विनायक सुर्वे, पाताडे , सहाय्यक पोलीस आयुक्त गिते, ठाणे नगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धर्माधिकारी यांच्यासह सदर स्टँडची पाहणी केली. यावेळी त्यांनी रिक्षा प्रवाशांशी संवाद साधला. अनेक रिक्षा प्रवाशांनी ठामपाने टाकलेल्या बॅरीकेट्समुळे त्रास होत असल्याच्या तक्रारी केल्या. तसेच, दोनपेक्षा अधिक रांगा असल्याने वृद्धांना तिसरी व चौथी रांग गाठणे त्रासदायक ठरत असल्याचे इंदिसे यांना सांगितले. त्यावर जितेंद्रकुमार इंदिसे यांनी, सदरचे बॅरीकेटस हटवण्याची विनंती  उपस्थित अधिकाऱयांना केली. तसेच, या दोन रांगा केल्यानंतर नियमभंग करणाऱया रिक्षा चालकांवर बिनधास्त कारवाई करावी, आपण त्याकामी पोलिसांना साह्य करु, असे वचनही इंदिसे यांनी दिले.
सुमारे दोन ते अडीच तास चाललेल्या या पाहणीमध्ये रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱयांनी अनेक प्रवाशांना रिक्षा पकडून देण्यास मदत केली. स्वत: इंदिसे यांनी अनेक वृद्धांना आधार देत रिक्षामध्ये बसविले. त्यामुळे अनेक  प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published.