ज्येष्ठ पत्रकारांच्या अनुभवाचा नव्या पिढीतील पत्रकारांनी उपयोग करून घ्यावा,राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या कार्यक्रमातला सूर
( श्रीराम कांदु )
ठाणे दि १७ नव्या पिढीतील पत्रकारांनी जुन्या पिढीतील पत्रकारांच्या अनुभवाचा निश्चित फायदा करून घ्यावा त्याचप्रमाणे तंत्रज्ञान बदलले असले तरी चांगली पत्रकारिता करण्यासाठी मेहनतीची गरज आहे यावर आजच्या राष्ट्रीय पत्रकार दिन कार्यक्रमात चर्चा झाली. कोकण विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्यातर्फे आयोजित या चर्चेत ज्येष्ठ पत्रकारांनी आपले अनुभव सांगितले.
जिल्हा माहिती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या वेळी प्रारंभी ज्येष्ठ पत्रकार स्व. सोमनाथ पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश मोरे यांनी यावेळी बोलतांना सांगितले कि, जुन्या आणि नव्या पत्रकारांचा सुसंवाद घडवून आणावा असे आमचे नियोजन असून त्यामुळे दर्जेदार पत्रकारिता होण्यास मदत होईल.
श्रीकांत नेर्लेकर यांनी ठाण्यातील पत्रकारिता कशी १५० वर्षे जुनी असून चांगल्या पत्रकारांची परंपरा लाभली आहे ते सांगितले. श्री एस रामकृष्णन व सुधीर कोऱ्हाळे यांनी पत्रकारितेतील त्यांचे अनुभव सांगितले. पत्रकारीते नवनवीन तंत्रज्ञान आले तरी पत्रकारांची ओळख आणि दबदबा कमी होता कामा नये याची काळजी नवीन पिढीने घ्यावी असे ते म्हणाले. याप्रसंगी बोलतांना ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ यांनी देखील आजच्या पत्रकारांनी विश्वासार्हता टिकविणे किती गरजेचे आहे ते सांगितले. सामनाचे माधव डोळे यांनी कवितेतून आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की चांगली बातमी करतांना शब्दांचे सामर्थ्य आवश्यक आहेच.
माहिती उपसंचालक डॉ गणेश मुळे यांनी सांगितले की, मुद्रित माध्यमे भविष्यात अधिकसक्षम बनतील मात्र त्यासाठी तिने काळाची पावले ओळखली पाहिजे तसेच दर्जा , विश्वासार्हता टिकविली पाहिजे. येणारा काळ आव्हानात्मक असला तरी एक चांगला पत्रकार हे आव्हान सहज पेलवू शकेल. विकासात्मक बातम्याना वृत्तपत्रे व माध्यमे चांगले स्थान देत आहेत हा बदल स्वागतार्ह आहे असेही ते म्हणाले.
शेवटी जिल्हा माहिती अधिकारी अनिरुध्द अष्टपुत्रे यांनी आभार मानले.