जैन इरिगेशनच्या पुढाकारातून टॉवरवरील ब्रिटीश कालीन घड्याळाची दुरुस्ती

 सुरत येथून बोलावला विशेष कारागीर, चार महिने केले शर्थीचे प्रयत्न

जळगाव शहरातील अतिशय महत्वाचा आणि गजबजलेला चौक म्हणजे शास्त्री टॉवर चौक. या ठिकाणी खरेदीच्या निमित्ताने मोठी गर्दी होत असते. चौकातील शास्त्री टॉवरवर असलेले घड्याळ गेल्या अनेक वर्षांपासून बंद होते. ते दुरूस्त करण्यासाठी जैन इरिगेशनने पुढाकार घेतला. हे घड्याळ सुरत येथील अशोक विसपुते यांनी चार महिने अथक परिश्रम घेऊन दुरूस्त केले. त्यामुळे टॉवरवरील या घड्याळाची टीक.. टीक जळगावकरांनी पुन्हा अनुभवता येणार आहे. इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्याकडून सामाजिक बांधिलकीचा वसा जैन इरिगेशनने जपला आहे. भाऊंचे उद्यान, महात्मा गांधी उद्यानासह शहराच्या सुशोभिकरणाच्या कार्यात महत्त्वाचे योगदान जैन इरिगेशनने दिलेले आहे.

जळगावातील शास्त्री टॉवरवरील घड्याळ दुरूस्तीसाठी महापालिकेने प्रयत्न केले मात्र त्यात त्यांना यश आले नाही. टॉवरवरील घड्याळ वजनदार असुन ते दहाव्या मजल्यावर असल्याने त्याच्या दुरूस्तीचे काम अतिशय जिकरीचे आणि आव्हानात्मकच होते. टॉवरवरील घड्याळ दुरुस्त करून जळगावच्या लौकिकात भर घालण्याचे महत्वपूर्ण कार्य जैन इरिगेशनने पूर्ण केले आहे.

घड्याळाची चार मजल्यापर्यंत वाईडींग चेन

टॉवरच्या दहाव्या मजल्यावर असलेल्या घड्याळाचे डायल 12 फुटांचे आहे. तर 5.5 फुट व 6 फुट लहान मोठे काटे आहेत. वाईडींग चेन 72 फुट म्हणजे 12 मीटर, चार मजल्यापर्यंत जाईल एवढी आहे. घड्याळाला पॉवर देण्यासाठी चार प्लेट असुन त्या सुमारे 180 ते 200 किलो वजनाच्या आहेत. घड्याळामध्ये पितळाचे व्हिल असुन यातील दोन व्हील तयार करण्यासाठी खुप परिश्रम करावे लागले. सुरत, मुंबई, बडोदा याठिकाणीहून घड्याळाचे पार्ट मागवावे लागले. दर आठ दिवसाने त्याला चावी द्यावी लागते. त्याच्या हाताळणीसाठी दोन जणांची नेमणूक करण्यात आली आहे.

टॉवरचे सुशोभिकरण

शहरातील अतिशय महत्वाचा चौक म्हणुन टॉवर चौकाकडे पाहिले जाते. बाहेरगावाहून येणारे आणि शहरातील बहुतांश नागरिक खरेदी करण्यासाठी याच चौकात येत असतात. सुशोभिकरणासाठी जैन इरिगेशनने हे टॉवर दत्तक घेतले आहे. त्यामुळे टॉवरच्या रंगरंगोटीचे काम जैन इरिगेशन कंपनीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. तसेच टॉवरच्या खाली असलेल्या लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याच्या मागे भिंत बांधुन त्या ठिकाणी ‘लाल बहादूर शास्त्री टॉवर’ असे नाव टाकले जाणार आहे. लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यावर संगमरवरची छत्री लवकरच तयार केली जाणार आहे.

भारतात दहा क्लॉक टॉवर

घड्याळांचे मनोरे शहराच्या मध्यभागी असलेल्या चौकात उभे करण्याची संकल्पना ब्रिटिशांनी भारतात आणली. भारतातील महत्त्वाच्या क्लॉक टॉवरमध्ये मुंबई विद्यापीठाचा राजाबाई टॉवर, घड्याळ गोदी, हुसेनाबाई क्लॉक टॉवर (लखनऊ), चौरा बझार क्लॉक टॉवर (हैद्राराबाद), देहरादून क्लॉक टॉवर, घंटा घर (मिर्झापूर), घंटा घर (जोधपूर), मिंट क्लॉक टॉवर (चेन्नई), क्लॉक टॉवर (म्हैसूर) यांचा समावेश आहे. अशाच महत्त्वाच्या टॉवरमध्ये जळगावचा उल्लेख केला जातो.

ट्रकभर कचरा काढला

अशोक विसपुते यांनी वडिल सदाशिव विसपुते यांच्याकडून घड्याळ दुरूस्तीचे प्रशिक्षण घेतले. टायटन सर्व्हिस सेंटरमध्ये काम केल्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळेच टॉवरवरील घड्याळ दुरूस्तीचे काम यशस्वी केल्याचे ते सांगतात. सुरवातीला कबुतरांचे ठिकाण बनलेल्या या घड्याळाची स्वच्छता केली. त्यात ट्रकभर कचरा होता. अतिशय दणकट असलेले हे घड्याळ वाईडींग पद्धतीचे आहे. त्याला इलेक्ट्रीक पद्धतीत आणण्याचा प्रयत्न झाल्याने ते निकामी झाले. दुरुस्तीच्या वेळी विशेष पद्धतीचे ग्रीस वापरण्यात आल्याचे विसपुते यांनी सांगितले.

जळगावकरांच्या भाव-भावना, संवेदना जोपासण्यासाठी जैन इरिगेशन नेहमी पुढाकार घेत असते- अशोक जैन,अध्यक्ष जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. जळगाव

टॉवर वरील हे घड्याळ ऐतिहासिक आहे. जळगाव शहराची शोभा वाढविणारे हे घड्याळ दुर्मिळ स्वरुपातील आहे. अशा दुर्मिळ गोष्टींचे आपणजतन करायला हवे. या सर्व वास्तु-वस्तुंमध्ये प्रत्येकाच्या भाव-भावना गुंतलेल्या असतात. जळगावकरांच्या भाव-भावना, संवेदना जोपासण्यासाठी जैन इरिगेशन नेहमी पुढाकार घेत असते. शास्त्री टॉवरवरील घड्याळाच्या दुरूस्तीचे कामही त्यातूनच करण्यात आले आहे.

– अशोक विसपुते, घड्याळ दुरूस्त करणारे कारागिर, सुरत

घड्याळ दुरूस्तीचा वसा वडिलांकडून मिळाला. माझ्या आयुष्यातील अनुभव पणाला लावुन आव्हानात्मक घड्याळ दुरूस्तीचे काम पुर्ण केल्याचे समाधान आहे. दहाव्या मजल्यावर चढुन दुरूस्ती करताना अडचणी आल्यात, मात्र जिद्द ठेवून घड्याळ दुरूस्त केले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email