जुळ्या बहिणींना मिळाले ‘जुळे’ गुण
बीड – जुळ्यांच्या जीवनात अनेक असे प्रसंग येतात की त्यावर विश्वास ठेवणे कठीण होऊन जाते. जुळ्यांची जुळ्यांशी लग्न झाल्याचे तुम्ही ऐकले असेल. पण, दहावीच्या एसएससी बोर्डात दोन जुळ्या बहिणींना जुळे गुण मिळाल्याचे तुम्ही कधी ऐकलेय का? बीड शहरातील चंपावती विद्यालयात शिकणा-या जुळ्या बहिणींना इयत्ता दहावीच्या परिक्षेत जुळे म्हणजेच ९५ टक्के गुण मिळाले आहेत.
संस्कृती आणि समृद्धी भारत मगर अशी या जुळ्या बहिणींची नांवे आहेत. या दोघीही पहिलीपासून सोबतच शिक्षण घेत आहेत. बीड येथील चंपावती विद्यालयातून त्यांनी दहावीची परीक्षा दिली होती.
या दोघींनाही दहावीच्या परिक्षेत ‘शेम टू शेम’ म्हणजे ९५ टक्के गुण मिळाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गणितासह तीन विषयातही त्यांना सारखेच गुण मिळाले आहेत. यांचे आई-वडील दोघेही शिक्षक असून, सारखेच गुण मिळविल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.