जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्रही वाढविणार – जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर
ठाणे – कृषि विभागातर्फे जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत कृषि तंत्रज्ञान तसेच योजनांची माहिती पोहचविण्यासाठी जिल्हा कृषि महोत्सव 2018 चे आज उन्नती गार्डन येथे उद्घाटन झाले . पहिल्याच दिवशी विविध विभाग ,संस्था आणि कंपन्यांच्या
दालनांना शेतकरी व नागरिकांची एकाच गर्दी झाली. उद्घाटनप्रसंगी बोलतांना जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी ठाणे जिल्ह्यात शेतीचा विविधांगी विकास करण्यासाठी पाऊले उचलण्यात आली आहेत असे सांगून रब्बीचे क्षेत्रही कसे अधिक वाढविता येईल यावर भर देणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी आमदार नरेंद्र पवार, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव यांनी देखील मार्गदर्शन केले.महापौर मीनाक्षी शिंदे, कृषी सभापती उज्वला गुळवी याही उपस्थित होत्या.
जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर आपल्या भाषणात म्हणाले की गेल्या वर्षी जलयुक्त शिवारमधील कामे तसेच कंपन्यांच्या आणि संस्थांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्याची कामे झाल्याने यंदाच्या उन्हाळ्यात शेतीसाठी पाण्याची उपलब्धता असणार आहे.
जिल्ह्यात विविध पिके कशी घेता येतील, नाविन्यपूर्ण प्रयोग कसे करता येतील त्याचप्रमाणे भाजीपाल्याचे क्षेत्र कसे वाढविता येईल याचा प्रयत्न आम्ही करीत असून त्यात यश मिळत आहे. वंचित अशा आदिवासी कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्याने कातकरी उत्थान कार्यक्रमात हजारो कातकरी कुटुंबाना दाखले वाटप केले तसेच त्यांच्या आरोग्याची तपासणी करून औषधोपाचार सुरु केले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.
डॉ विवेक भीमनवार यांनी देखील आपल्या भाषणात पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचे अनुभव आणि ज्ञान इतर शेतकऱ्यांना देखील माहित होण्यासाठी असे महोत्सव उपयोगी ठरतात असे सांगितले. वातावरणातील बदलांमुळे शेतीवरही परिणाम होत असून उत्पादन वाढीसाठी तसेच शेतीला जागविण्यासाठी शासनाच्या विविध योजनांमुळे शेतीला शाश्वतता येण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना निश्चित बाजारपेठ उपलब्ध करून त्यांच्या उत्पादनाला योग्य किंमत मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे असेही विवेक भीमनवार म्हणाले.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.त्यानंतर सर्व मान्यवरांनी प्रदर्शनातील प्रत्येक दालनास भेटी दिल्या.
पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार
याप्रसंगी वर्ष २०१० पासून २०१४ पर्यंतचे प्रस्कार प्राप्त शेतकरी यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रकाश कोरडे,चंद्रकांत बाबाजी देशमुख, रमेश देशमुख, कासाबाई शिंदे, राजेंद्र श्रीकृष्ण भट, तात्या हंबीर, श्रीमती माधुरी भोईर, विजय पाटील यांचा समावेश होता.
विभागीय कृषी सह संचालक विकास पाटील, आत्मा संचालक सुभाष खेमनार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एम डी सावंत, आत्मा प्रकल्प संचालक पी एम चांदवडे, कृषी विकास अधिकारी डॉ प्रफुल्ल बनसोडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. उपविभागीय अधिकारी जे एस.घोडके यांनी आभार मानले.
दालनांवर लोकांची गर्दी
जिल्ह्यात प्रथमच होणाऱ्या अशा भव्य स्वरुपाच्या या कृषि महोत्सवात शेतीतील विविध प्रकारचे एकुण १२० स्टॉल आहेत. यामध्ये महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषि अभियांत्रिकी, कृषि निविष्ठांचे स्टॉलचा प्रामुख्याने समावेश आहे. महसूल ,वन विभाग, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, मृद व जलसंधारण विभाग, बँक ऑफ महाराष्ट्र, प्रधानमंत्री मुद्रा योजना, कृषी विभाग, बियाणे महामंडळ, भात कापणी यंत्रांची माहिती देणारी दालने, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, या दालनांवर लोकांची गर्दी होती.याशिवाय विविध सेंद्रिय धान्यांची व जिल्ह्यात पिकणाऱ्या तांदळाची दालनेही गजबजली होती.
महिला बचत गटाच्या विशेषत: खाद्य आणि भोजनाच्या दालनांमध्येही लोकांची गर्दी झाली होती. विविध प्रांतातल्या भाकऱ्या, झुणका,हुरड्याचे थालीपीठ, पोहे, मिसळ, तसेच इतर पदार्थ चाखण्यासाठी प्रदर्शनाला भेट देणारे लोक गर्दी करीत होते असे दिसले.
या परिसंवादामध्ये दि. १२मार्च २०१८ रोजी श्री एल एच चव्हाण , प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, श्री उत्तम सहाने कृषी विज्ञान केंद्र कोसबाड, डॉ. गभाले, कृषि संशोधन केंद्र, पालघर यांचे उपस्थितीत शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद भास्कर पाटील, उपसरव्यवस्थापक पणन मंडळ, रत्नागिरी, भडसावळे, कृषिभूषण शेतकरी, नेरळ,कर्जत यांचे व्यख्यान दि. १३ मार्च २०१८ रोजी शेतकरी उत्पादक कंपनी प्रतिनिधी, खरेदीदार व निर्यातदार यांचे खरेदीदार-विक्रेता सम्मेलन तसेच संजय पारडे, सहाय्यक व्यवस्थापक एचटीसी तळेगाव दाभाडे, रवींद्र देशमुख, व्यवस्थापक एचटीसी तळेगाव दाभाडे, मकरंद चुरी, प्रगतशील शेतकरी, शहापूर राजेंद्र भट,कृषिभूषण शेतकरी, डॉ. प्रफुल्ल बनसोडे, कृषी विकास अधिकार, जि.प.ठाणे, जांभूवंत घोडके, उपविभागीय कृषी अधिकारी, कल्याण यांचे व्याख्यान दि.१४ मार्च २०१८ रोजी तुषार खारकर, निर्यातदार, पुणे, तुषार आंमरे, शास्तज्ञ, एनएचआरडीफ, नासिक तुषार उगले, सहा. प्राध्यापक, किटकशास्तज्ञ, के. के. वाघ कृषी महाविद्यालय,नासिक, अनंत बनसोडे, कृषी सल्लागार, नासिक, डी एस. घोलप मृद विश्लेषण व मृद चाचणी अधिकारी, ठाणे यांचे व्याख्यान दि १५ मार्च २०१८ रोज्जी सुकळीकर, जिल्हा समन्वयक, प्रायमुव्ह, सेवा पुरवठादार संस्था एमएसीपी प्रकल्प,ठाणे मनोहर शेटे, सेंद्रिय शेती तज्ञ नासिक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.