जिल्ह्यातील तीन तालुके पूर्णत: ऑनलाईन;तलाठ्याच्या स्वाक्षरीचा सातबारा आता घरबसल्या

पालकमंत्र्यांकडून महसूल कर्मचाऱ्यांचाही गौरव

ठाणे – ठाणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये सातबारा संगणकीकारणाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले असून उर्वरित चार तालुक्यातील कामही महिन्याभरात पूर्ण होईल. या कामामुळे आता नागरिक किंवा शेतकरी कुणालाही तलाठ्याच्या स्वाक्षरीच्या सातबारा उताऱ्याची घरबसल्या प्रिंट मिळू शकेल. विशेष म्हणजे हा सातबारा सर्व प्रकारच्या शासकीय व निम शासकीय कामांसाठी ग्राह्य धरला जाणार असून तलाठ्याच्या वेगळ्या स्वाक्षरीची गरज नाही.पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते येथील नियोजन भवनातील सभागृहात या डिजिटल सातबाराचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले, यावेळी हे काम दिवसरात्र मेहनतीने पूर्ण करणाऱ्या तलाठी, मंडळ अधिकारी व नायब तहसीलदार यांचाही सत्कार प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला

https://mahabhulekh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून पूर्वी ऑनलाईन सातबारा केवळ पहाता यायचा. आता तलाठ्याची स्वाक्षरी असलेला सातबारा प्रिंट काढता येणार आहे . या सुविधेमुळे तहसील कार्यालयांत या कामासाठी खेटे मारण्याची आवश्यकता उरली नाही त्याचप्रमाणे काम गतिमान आणि अधिक पारदर्शक होईल असा विश्वास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.

तलाठ्यांच्या पाठीशी

उत्पन्नाच्या दाखल्यांवरून तलाठ्यामध्ये नाराजीचे वातावरण आहे, काही जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र मी स्वत: मंत्रिमंडळ बैठकीत ही गोष्ट मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांच्या कानावर घातली असून तलाठ्यांना त्रास होणार नाही याची खात्री बाळगा असेही पालकमंत्री म्हणाले.

याप्रसंगी बोलतांना अपर जिल्हाधिकारी अनिल पवार यांनी सांगितले की, येत्या महिन्याभरात उर्वरित चार तालुक्याचे राहिलेले थोडेसे कामही पूर्ण होईल आणि संपूर्ण जिल्हा सातबारा डिजिटल होईल.

असे पेलले शिवधनुष्य

याप्रसंगी बोलतांना उपजिल्हाधिकारी साप्रवि जलसिंग वळवी म्हणाले की, महसूल कर वसुली, नैसर्गिक आपत्ती, तसेच निवडणूक आणि इतर अनेक बाबी असतांना देखील ठाणे जिल्ह्यातील तलाठी व महसूल कर्मचाऱ्यांनी हे आव्हान पेलले आहे. अंबरनाथ , कल्याण आणि उल्हासनगर हे १०० टक्के ऑनलाईन झाले असून एकूण ९५३ गावांपैकी ८५० गावे यामध्ये ऑनलाईन झाली आहेत. अंबरनाथ मधील बांदनवाडी हे गाव डिजिटल सातबारासह पूर्ण डिजिटल झाले आहे. कुठल्याही प्रकारचे ठोस तांत्रिक पाठबळ नसतांना किंवा अपुरी इन्टरनेट सुविधा, आणि पुरेसा वेग नसतांना देखील तलाठी, मंडळ अधिकारी यांनी कार्यरत राहून मिळेल त्या मार्गाने यातील प्रश्न सोडविले. जिल्हाधिकारी डॉ कल्याणकर यांनी देखील याकामी स्वत: ठिकठिकाणी भेटी देऊन प्राधान्याने हे काम पूर्ण होईल असे पाहिले. जिल्ह्यात ३२ वर्कस्टेशन्स उभारण्यात आली असून तलाठ्यांना लॅपटॉपही देण्यात आले आहेत असे ते म्हणाले.

यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी डॉ शिवाजी पाटील यांनी आभार मानले. जनसंपर्क अधिकारी संगीता पवार आणि नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी, संतोष थिटे, प्रसाद उकर्डे तसेच सर्व तहसीलदार देखील उपस्थित होते.  

Leave a Reply

Your email address will not be published.