जिल्हा परिषद शिक्षण विभागाने एकाच दिवशी केली ४६ हजार ६५६ वृक्षांची लागवड
(श्रीराम कांदु)
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांनी केले वृक्षारोपण
ठाणे दि.०२ – शाळांच्या आवारात वृक्षदिंडी काढत , पर्यावरण संवर्धनाचा जागर करत विद्यार्थी , शिक्षक यांच्या मदतीने एकाच दिवशी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने रविवार १ जुलै रोजी तब्बल ४६ हजार ६५६ वृक्ष लागवड केली. जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी जि.प.गोवेली शाळेच्या विद्यार्थां समवेत वृक्षारोपण केले. शिक्षण विभागाने केलेल्या कामाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी कौतुक केले.
तसेच या वृक्ष लागवडी सोबत विद्यार्थांमध्ये वृक्ष संवर्धनाचे महत्व कळावे याकरिता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. त्याच बरोबर वक्तृत्व , चित्रकला , भित्तीपत्रक , पथनाट्या आदि स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थांमध्ये पर्यावरण संवर्धनाचे महत्व विषद करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील मुरबाड, कल्याण , भिवंडी , अंबरनाथ , शहापूर या पाच तालुक्यांमध्ये असणाऱ्या शाळांमध्ये अनुक्रमे १० हजार ६३८ , ५ हजार ३४६ , १० हजार ०९८ , ६ हजार १०२ , १४ हजार ४७२ अशी अनुक्रमे ४६ हजार ६५६ वृक्ष लागवड करण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी सांगितले.
तसेच ठाणे जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या माध्यातून जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज दिवसभर वृक्षारोपण करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी कल्याण तालुक्यातील म्हारळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये दुपारी वृक्षारोपण केले.