जिल्हा परिषदेच्या कामात पारदर्शकता आणणार प्रशासनासमवेत एकजुटीने काम करणार – मंजुषा जाधव
श्रीराम कांदु
ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या कामामध्ये गतिमानता व पारदर्शकता आणून लोकाभिमुख कार्य करण्यासाठी सर्व अधिकारी कर्मचारी यांनी तत्परतेने काम करणे महत्वाचे असून प्रशासक आणि लोकप्रतिनीधीनी एकजुटीने काम केल्यास ठाणे जिल्हा परिषद राज्यात आदर्श जिल्हा परिषद म्हणून नावारूपाला येईल असा विश्वास नवनिर्वाचित जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मंजुषा जाधव यांनी आज येथे व्यक्त केला.
मंजुषा जाधव आणि उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी आज विविध खात्यांच्या खातेप्रमुखाशी संवाद साधून खातेनिहाय कामांचा आढावा घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार आणि सर्व खातेप्रमुखांनी पुष्पगुच्छ देवून अध्यक्ष-उपाध्यक्षांचे स्वागत केले.
यावेळी विवेक भीमनवार म्हणाले , प्रशासनाकडून लोकप्रतिनिधीना संपूर्ण सहकार्य केले जाईल. जिल्हाच्या ग्रामीण भागाचा विकास हेच धोरण प्रशासनाचे असल्याने आगामी काळात नाविन्यपूर्ण योजना आखून त्या पद्धतीने कामाचे नियोजन करण्यात येईल असेही ते म्हणाले.
जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुखांनी स्वपरिचय देवून आपापल्या कामाबद्दल सद्यस्थिती सांगितली. या आढावा बैठकीस माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी रविंद्र पाटील, उप मुख्य कार्यकारी (सा) चंद्रकांत पवार , मुख्य लेखा व वित्ताधिकारी गीता नागर , उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत ) डी. वाय. जाधव , शिक्षणाधिकारी मीना यादव , जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोडे , जिल्हा समाज कल्याण अधिकारी रविकिरण पाटील , जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले , उप मुख्य लेखाधिकारी मनोजकुमार शेट्ये , आदी अधिकारी वर्ग उपस्थित होते.