जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी शिवसेनेच्या मंजुषा जाधव तर उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादीच्या सुभाष पवार यांची बिनविरोध निवड
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी शिवसेनेच्या मंजुषा जाधव तर उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादीच्या सुभाष पवार यांची बिनविरोध निवड
ठाणे महापालिके पाठोपाठ ठाणे जिल्हा परिषदेवरही भगवा फडकला आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी शिवसेनेच्या मंजुषा जाधव तर उपाध्यक्ष पदी सुभाष पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. अलिकडेच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेनं सर्वाधिक २६ जागा जिंकून जिल्हा परिषदेवर वर्चस्व मिळवलं होतं. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं १४, राष्ट्रवादी काँग्रेसनं १०, काँग्रेस १ तर एका जागी अपक्ष निवडून आला होता. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी आज निवडणूक होणार होती. शिवसेनेतर्फे मंजुषा जाधव यांनी अध्यक्ष पदासाठी तर राष्ट्रवादीच्या सुभाष पवार यांनी उपाध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भारतीय जनता पक्षातर्फे अध्यक्ष पदासाठी नंदा उगडा तर उपाध्यक्ष पदासाठी अशोक घरत यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र अर्ज मागे घेण्याच्या वेळी या दोघांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं जिल्हा परिषद अध्यक्षपदी शिवसेनेच्या मंजुषा जाधव आणि उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादीच्या सुभाष पवार यांची बिनविरोध निवड झाली. सुभाष पवार हे माजी आमदार गोटीराम पवार यांचे चिरंजीव आहेत.