जिल्हाधिकाऱ्यांच्या निरोप आणि स्वागताच्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात पालकमंत्री, खासदार स्वत: उपस्थित प्रशासनाचा गाढा अनुभव असलेले राजेश नार्वेकर ठाणे जिल्हाधिकारी म्हणून रुजू

ठाणे दि १४ – ठाणे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेले राजेश नार्वेकर यांना प्रशासनाच्या विविध पदांवर कामाचा गाढा अनुभव असून महत्वाच्या उपक्रमांना चालना देण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे.

१८ मे १९६८ रोजी जन्मलेले राजेश नार्वेकर यांच्याकडे एमए (इतिहास) ही पदवी आहे. ते २००९ च्या आयएएसच्या बॅचचे अधिकारी असून ठाणे जिल्हाधिकारी म्हणून रुजू होण्यापूर्वी ते मुख्यमंत्र्यांचे सहसचिव म्हणून कार्यरत होते. आज दुपारी मावळते जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार कपिल पाटील, राजेश नार्वेकर यांच्या पत्नी सीमा, डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या पत्नी कलाराणी आदींची उपस्थिती होती.

विविध विभागांतील अनुभव

१९९१४-९६ मध्ये रत्नागिरी येथे परिविक्षाधीन अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द सुरु झाली. १९९६ ते २००० या कालावधीत ते दापोली येथे प्रांत अधिकारी होते. २००० ते २००१ पर्यंत करमणूक विभागात उपजिल्हाधिकारी, २००१ ते २००३ या कालावधीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे खासगी सचिव, २००५ ते २००६ मध्ये म्हाडाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी, २००६ ते २००८ मध्ये मुद्रांक अधीक्षक, २००८ ते २०११ मध्ये एमआयडीसी येथे उप मुख्य कार्यकारी अधिकारी, २०११ ते २०१४ महसूल विभागात उपसचिव, २०१४ ते २०१६ मुख्यमंत्र्यांचे उपसचिव म्हणून प्रथमच त्यांना मुख्यमंत्री सचिवालयात नियुक्ती मिळाली. २०१६ ते २०१७ या कालावधीत ते रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यानंतर ते सप्टेंबर २०१७ पासून आजतागायत मुख्यमंत्री यांचे सहसचिव या पदावर होते.

महत्वाच्या उपक्रमांच्या नियोजनात सहभाग

राजेश नार्वेकर एमआयडीसी येथे कार्यरत असतांनाच दिल्ली –मुंबई औद्योगिक कॉरीडॉरची सुरुवात झाली होती या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या नियोजनात त्यांचा मोठा सहभाग होता, यासाठी ते जपान येथे प्रशिक्षणासाठी देखील गेले होते.

रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतांना स्वच्छ भारत अभियानात त्यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा हागणदारीमुक्त झाला. ग्रामीण भागात त्यांनी स्वच्छ भारत आणि पंतप्रधान आवास योजना प्रभावीपणे राबवल्या.

मुद्रांक शुल्क विभागात काम करतांना आय सरिता, ई पेमेंट, ई मुद्रांक, ई नोंदणी अशा स्वरूपात माहिती तंत्रज्ञान विकसित झाले त्यात त्यांचाही सहभाग होता. तसेच त्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाच्या कालखंडात रायगड जिल्हा हगणदारीमुक्त झाला.

मुख्यमंत्री सचिवालयात त्यांनी नगरविकासासारख्या महत्वपूर्ण आणि संवेदनशील विभागाचे काम सक्षमपणे हाताळले. मुंबईचा विकास आराखडा तयार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

भावपूर्ण वातावरणात निरोप आणि स्वागतही…

एरव्ही जिल्हाधिकारी कार्यभार हस्तांतरित करतात तेव्हा ती कार्यालयातील दालनातील औपचारीकता असते परंतु आज डॉ महेंद्र कल्याणकर यांना निरोप आणि नूतन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे स्वागत करण्यासाठी नियोजन भवन सभागृहात तुडूंब गर्दी झाली होती. स्वत: पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार कपिल पाटील यासाठी उपस्थित होते. सुमारे अडीच तास हा कार्यक्रम चालला तेव्हा अधिकाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. सीमा नार्वेकर आणि कलाराणी कल्याणकर यांचा देखील यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पत्नी म्हणून बजावत असलेल्या भुमिकेबद्धल गौरव करण्यात आला.

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी, अपर जिल्हाधिकारी अनिल पवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम, कोकण विभाग नोंदणी उप महानिरीक्षक आणि मुद्रांक उपनियंत्रक अमोल यादव यांनी कल्याणकर यांच्या प्रशासन कार्यकुशलतेविषयीचे त्यांचे अनुभव सांगितले. तसेच राजेश नार्वेकर यांच्यासारखे मुख्यमंत्री सचिवालयातील कामाचा अनुभव असलेले , मनमिळावू अधिकारी लाभल्याबद्धल समाधान व्यक्त केले.

खासदार कपिल पाटील यांनी आपल्या भाषणात अधिकाऱ्यांनी हो म्हणायला शिकावे आणि लोकप्रतिनिधींनी नाही म्हणायला शिकले पाहिजे या उक्तीप्रमाणे डॉ कल्याणकर यांनी सकारात्मक दृष्टीने काम केले असे कौतुक केले.

अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचा उत्तम ताळमेळ

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध योजना आणि उपक्रमांचे उद्दिष्ट्य ओलांडूनही या जिल्ह्यात काम झाले याचे करण येथील अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचा उत्तम ताळमेळ आहे असे सांगितले. मी देखील एक मंत्री म्हणून नव्हे तर कार्यकर्त्याच्या भूमिकेतून काम करीत असतो आणि कुठलेही अनुचित काम करण्यासाठी आम्ही प्रशासनावर कधीच दबाव टाकत नाही असे सांगून त्यांनी ठाणे जिल्हा विविध क्षेत्रात प्रथम क्रमांकावर नेऊत असे सांगितले.

राजेश नार्वेकर हे यापूर्वी मुख्यमंत्री सचिवालयात बैठकांच्या निमित्ताने नेहमी भेटत असत आणि त्यांच्या कामाची पद्धत आम्हाला ठाऊक आहे असे प्रशंसोद्गार त्यांनी काढले.

योग्य कामासाठी कशाचाही अडसर नसेल

आपल्या भाषणात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर म्हणाले की, योग्य व उचित कामासाठी प्रसंगी कायद्यातील अडचणीतून देखील मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्याची आपली भूमिका आहे. माझे शिक्षण ठाणे शहरात झाले असून या जिल्ह्याविषयी आत्मीयता आहे असे सांगून ते म्हणाले की, जलयुक्त शिवार, प्रधानमंत्री आवास योजना यासारख्या प्रमुख योजनांची काटेकोर अंमलबजावणी होण्याकडे लक्ष्य दिले जाईल. आगामी काळातील निवडणुका पहाता जिल्हा नियोजनचा निधी व्यवस्थित खर्च कसा होईल हेही पाहणे महत्वाचे आहे असेही त्यांनी सांगितले.

डॉ महेंद्र कल्याणकर यांनी देखील आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले की, केवळ महसूलच नव्हे तर इतर विभागाची देखील आपल्याला योजनांच्या अंमलबजावणीसाठी खूप चांगले सहकार्य केले त्यामुळे ठाण्यासारख्या मोठ्या जिल्ह्यात काही नाविन्यपूर्ण कामे मार्गी लावण्यात आपण यशस्वी ठरलो.

निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, आणि मावळत्या जिल्हाधिकारी यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कामांचा उल्लेख केला तसेच नूतन जिल्हाधिकारी यांच्यासमवेत अधिक उतसाहणे काम करण्याची संधी मिळाल्याच्या भावना व्यक्त केल्या.

जलयुक्त शिवार कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

याप्रसंगी ठाणे जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारविषयक कामांवर आधारित कॉफी टेबल बुकचे प्रकाशन पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते झाले. हे पुस्तक ठाणे जिल्हा कृषी विभागाने तयार केले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email