जलवाहतुकीसाठी पाणी-जमिनीवर चालणाऱ्या अँफिबियस बसचाही वापर
(श्रीराम कांदु)
ठाणे – बहुचर्चित कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतुकीसाठी बोटींबरोबरच जमीन तसेच पाण्यावर चालणाऱ्या अँफिबियस बसचाही वापर करण्याची सूचना केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी केली. या जलवाहतूक प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण गडकरी यांच्याकडे ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले. याप्रसंगी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे उपस्थित होते. खा. डॉ. शिंदे यांनी यापूर्वीच जेएनपीटीकडे असलेली अँफिबियस बस या जलवाहतूक प्रकल्पासाठी ताब्यात घेण्याची मागणी ठाणे महापालिकेकडे केली आहे.
या जलवाहतूक आराखड्यात दिव्याचाही समावेश करण्याची आग्रही मागणी खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी केली. अलिकडेच खा. डॉ. शिंदे यांनी खाडीतून सैर करत या जलवाहतूक मार्गाची पाहाणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी बैठकीत चर्चा करत असताना रेल्वे आणि रस्ते वाहतुकीच्या तुलनेत हा किफायतशीर पर्याय ठरणार असल्यामुळे दिव्याचा देखील या प्रकल्पात समावेश करण्याची मागणी खा. डॉ. शिंदे यांनी केली.
या प्रकल्पासाठी रिव्हर ट्रॅफिक कंट्रोल यंत्रणेचा वापर करतानाच जेट्टीच्या ठिकाणी शॉपिंग आणि फुड कोर्ट विकसित करावा, स्थानिकांना रोजगार द्यावा, तसेच डिझेल ऐवजी कमी प्रदूषण करणाऱ्या मिथेनॉलचा वापर करणाऱ्या बोटींचा वाहतुकीसाठी वापर करावा, अशाही सूचना गडकरी यांनी या बैठकीत केल्या.