जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाचा खून

नगर – लोणी काळभोर -वडिलोपार्जित शेतजमिनीच्या भांडणाच्या कारणावरून मेव्हण्याच्या सांगण्यावरून कट रचून भावाने आपल्या दोन मुलांच्या सहाय्याने सख्ख्या भावाचा पाणी धरण्याचे खोरे, लाकडी दांडके व टिकावाने मारून निर्घृणपणे खून केल्याची घटना भांबोरा, यमाईनगर (ता. कर्जत, जि. अहमदनगर) येथे घडली. हनुमंत कोंडीबा चव्हाण (वय ५५) असे खून झोलल्याचे नाव आहे.

राहूल हनुमंत चव्हाण (वय २७, रा. भांबोरा, यमाईनगर, ता. कर्जत) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी अहमदनगर पोलीसांकडे वर्ग केला आहे. रमेश कोंडीबा चव्हाण, किरण रमेश चव्हाण, गणेश रमेश चव्हाण (सर्व रा. भांबोरा यमाईनगर) व सुनील रामदास पवार (रा. घुगलवडगांव, ता. श्रीगोंदा) अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत.

हनुमंत व रमेश चव्हाण या दोघांनी ७ ते ८ वर्षांपूर्वी बहीण भामाबाई सर्जेराव शितोळे (रा. भांबोरा) यांच्याकडून प्रत्येकी अर्धा एकर शेती विकत घेतली होती. त्यानंतर ५ ते ६ वर्षांपूर्वी पैशांची गरज असल्याने हनुमंत चव्हाण यांनी भाऊ रमेशचा मेव्हणा सुनील रामदास पवार यांस तीन लाख रुपयांना शेती विकली होती. पवार याने ही जमीन त्यांची बहिण व रमेश चव्हाण याची बायको हिच्या नावे खरेदीखताने घेतली होती.

हा व्यवहार होताना हनुमंत चव्हाण यांच्याकडे पैसे आल्यानंतर तीन लाख रुपये घेऊन जमीन परत द्यायची ठरले होते. ४ ते ५ महिन्यांपूर्वी हनुमंत चव्हाण यांचेकडे उसाचे पैसे आल्याने 3 लाख रुपये जमवून जमीन परत घेण्याकरिता सुनील पवार याच्याकडे गेले; परंतु पवार याने जमीन परत देण्यास नकार दिला.

६ मे रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास याच कारणावरून दोन्ही भावांत वाद झाला. त्यावेळी हनुमंत हे रमेश यांस “आपण जमिनीची मोजणी करू’, असे म्हणत होते; परंतु रमेश याने त्यांचे काहीच ऐकून न घेता शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व त्याने अचानक हातात पाणी धरण्याचे खोरे त्यांचा मुलगा किरण याने लाकडी दांडके व गणेश याने लोखंडी टिकाव घेऊन हनुमंत यांच्या अंगावर धावून आले.

त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली म्हणून हनुमंत यांची राहुल व महेंद्र ही दोन मुले भांडणे सोडविण्यासाठी गेले. त्यावेळी रमेश याने भाऊ हनुमंत यांना पकडले होते. किरण हा लाकडी दांडक्‍याने मारहाण करत होता. तेवढ्यात गणेश याने त्याचे हातातील लोखंडी टिकाव डोक्‍यात जोरात मारला. जखमी हनुमंत चव्हाण यांना उपचारासाठी तात्काळ दौंड येथील पिरॅमिड रुग्णालयात व पुढील औषधोपचारासाठी त्यांच्या मुलांनी ससून रुग्णालयात नेण्याचे ठरवले.

रुग्णवाहिकेतून पुणे येथे निघाले असता त्यांनी यवत टोलनाका ओलांडून पुढे आले असता हनुमंत यांचा श्वासोश्वास व शरीराची हालचाल मंदावल्याचे जाणवले म्हणून त्यांना लोणी स्टेशन येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नेले असता तेथील डॉक्‍टरांनी ते मृत झाले असल्याचे घोषित केले.

Leave a Reply

Your email address will not be published.