जपान दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन
“वार्षिक संमेलनासाठी 28-29 ऑक्टोबरला मी जपानला भेट देईन. सप्टेंबर 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यापासून पंतप्रधान शिंझो अबे यांच्याबरोबर ही माझी 12 वी भेट असेल. त्यानंतर मी 2016 मध्ये जपानला वार्षिक संमेलनासाठी भेट दिली होती.
गेल्या वर्षी पंतप्रधान अबे आणि श्रीमती अकी अबे यांचा गुजरात मध्ये पाहुणचार करण्याची संधी मला मिळाली. जपान हा भारताचा अत्यंत महत्त्वपूर्ण मित्र देश आहे. या दोन्ही देशात विशेष धोरणात्मक भागीदारी आहे. गेल्या काही वर्षात जपानबरोबरील आपल्या आर्थिक, व्यूहरचनात्मक भागीदारीत आमूलाग्र बदल झाला आहे. ही भागीदारी आता भारताच्या मजबूत “पूर्वेकडे पहा” धोरणावर तसेच दोन्ही देशांच्या मुक्त, खुल्या आणि समावेशी इंडो-पॅसिफिकच्या सामायिक धोरणावर आधारित आहे.
लोकशाहीवर आधारित हे दोन्ही देश समान मूल्यांचा पुरस्कार करतात आणि सर्वांसाठी शांतता आणि समृद्धीची अपेक्षा करतात.
परस्परपूरकतेमुळे दोन्ही देशांना भागीदारीचा फायदा होईल. आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जपान आज भारताच्या सर्वात विश्वासू मित्रदेशांपैकी आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन किंवा वेगवान मालवाहू रेल्वे मार्ग अशा प्रकल्पांनी दोन्ही देशातील भागीदारी अधोरेखित केली आहे. मेक इन इंडिया, स्कील इंडिया, डिजिटल इंडिया, स्टार्ट-अप इंडिया अशा राष्ट्रीय योजनांमध्येही जपान महत्त्वपूर्ण भागीदार आहे.
जपानी गुंतवणूकदारांचा भारताच्या आर्थिक भविष्यावर दृढ विश्वास आहे.
तंत्रज्ञान, नवीन कल्पना यातील जपानच्या नेतृत्त्वाचा भारत आदर करतो. यंत्रमानव क्षेत्रातील जपानच्या उच्च क्षमता मला या भेटीत पाहायला मिळतील.
पंतप्रधान शिंझो अबे, जपानी आणि भारतीय उद्योगपतींशी या भेटीत दीर्घ चर्चा होतील. मी भारतीय समुदायाशीही संवाद साधेन”
दोन्ही देशातील व्यापार संबंध, गुंतवणूक वाढीस लावण्याकरिता या भेटीची मदत होईल. तसेच आरोग्य, डिजिटल तंत्रज्ञान, कृषी, अन्नप्रक्रिया, आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रातही सहकार्य वाढवण्यासाठी ही भेट उपयोगी ठरेल.
दोन्ही देशातील खासदारांमधील तसेच भारतीय राज्ये आणि जपानी प्रीफेक्चरस् (प्रशासकीय प्रदेश) यांमधील वाढत्या संबंधांचे मी स्वागत करतो. दोन्ही देशांच्या शिक्षण, कौशल्य विकास, सांस्कृतिक, पर्यटन क्षेत्रातील वाढते संबंध हे आनंददायी आहेत.
इतिहासावर आधारित दोन्ही देशातील मैत्री या भेटीमुळे उज्ज्वल आणि समृद्ध भविष्याकडे वाटचाल करेल.”