जपान दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन
टोकिओमध्ये आणि या आधी यामानाशी येथे आणि आपल्या निवासस्थानी ॲबे सान यांनी ज्या आत्मियतेने माझे स्वागत केले त्यामुळे माझा जपान दौरा अधिक सफल आणि अविस्मरणीय ठरला आहे. जपान हा पूर्व आणि पश्चिम संस्कृतीमधल्या सर्वश्रेष्ठ पैलूंचा संगम आहे. हा तोच महान देश आहे ज्याने मानव जातीच्या विकासाचा मार्ग प्राचीन आणि नूतन यांच्यातल्या संघर्षाचा नव्हे तर त्यांच्या सहअस्तित्व आणि सृजनाचा आहे हे या देशाने शिकवले आहे. नाविन्याचे स्वागत आणि प्राचीनतेचा सन्मान ही जपानची जागतिक संस्कृतीला दिलेली मोठी देणगी आहे. त्याचबरोबर भारत आणि जपान यांच्यातले हे साम्य स्थळही आहे.
जपान आणि भारत यांच्यातले संबंध हिंदी आणि प्रशांत महासागराप्रमाणे विस्तृत आणि सखोल आहेत. लोकशाही मूल्य आणि स्वातंत्र्याप्रती कायद्याच्या चौकटीप्रती कटिबद्धता यावर हे संबंध आधारित आहेत. दोन्ही देशातील संबंध अधिक वृद्धींगत होण्याच्या व्यापक दृष्टीकोनावर ॲबे आणि मी यांच्यात काल आणि आज चर्चा झाली. या एकत्रित दृष्टीकोन दस्तावेजावर आम्ही आज स्वाक्षऱ्याही केल्या आहेत. हा दस्तावेज आपले भविष्य अधिक उज्ज्वल करणार आहे. डिजीटल भागीदारीपासून सायबर स्पेसपर्यंत, आरोग्यापासून सुरक्षेपर्यंत आणि सागरापासून ते अंतराळापर्यंत प्रत्येक क्षेत्रातले सहकार्य अधिक वेगवान करण्याला उभय देशांची संमती आहे. जपानमधल्या गुंतवणुकदारांनी भारतात 2.5 अब्ज डॉलर नव्या गुंतवणुकीची घोषणा केल्याची माहिती मला देण्यात आली आहे. यामुळे भारतात 30,000 लोकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत. या दौऱ्यादरम्यान द्विपक्षीय चलन व्यवस्थेवर झालेल्या सहमतीमुळे परस्पर विश्वास आणि आर्थिक भागीदारी सातत्याने वृद्धींगत होणार आहे.
21 वे शतक हे आशियाचे शतक आहे. मात्र, त्याचे रुप आणि स्वरुप कसे असेल याबाबत प्रश्न आहे. कोणाचा फायदा होईल, काय करावे लागेल असे अनेक प्रश्न आहेत. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की, भारत आणि जपान यांच्यातले सहयोगावाचून 21 वे शतक आशियाचे शतक असू शकणार नाही. दोन्ही देशाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि संरक्षण मंत्री यांच्यात टू प्लस टू संवादासाठी आबे सान आणि मी यांच्यात सहमती झाली आहे. जगात शांतता आणि स्थैर्याला प्रोत्साहन देणे हा या मागचा उद्देश आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये जपानचा प्रवेश जागतिक हिताच्या दृष्टीने सहकार्याचे एक आणखी उज्ज्वल उदाहरण ठरणार आहे.
पुढच्या वर्षी जपान ओसाकामध्ये जी-20 शिखर परिषदेचे यजमानपद भूषवणार आहे. पुढच्या वर्षी रग्बी जागतिक चषकही जपानमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा आशियामध्ये प्रथमच आयोजित होणार आहे. त्यानंतर 2020 मध्ये टोकिओमध्ये ऑलिम्पिक्सही आयोजित केले जाणार आहे. या सर्व महत्वाच्या जागतिक कार्यक्रमासाठी माझ्यासह संपूर्ण भारतवासीयांकडून हार्दिक शुभेच्छा.
भारत आणि जपान यांच्यातल्या संबंधांची प्रगती जपानच्या काईजन तत्वज्ञानाप्रमाणे असीम आहे. हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी पंतप्रधान ॲबे आणि मी कटिबद्ध आहोत. ॲबे यांना, जपान सरकारला आणि आपणा सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो.