जन्मदात्या बापानेच दारुच्या नशेत केला १५ वर्षीय मुलीवर अत्याचार
नगर – जन्मदात्या बापानेच दारुच्या नशेत आपल्या १५ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना अकोले तालुक्यात घडल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत सदर मुलीच्या वडिलांविरुद्ध राजूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानवजातीला काळिमा फासणार्या या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सदर मुलगी आपल्या आई, वडील व भावासमवेत राहते. साधारणपणे जून महिन्यात नेहमीप्रमाणे सर्वजण जेवण करून घरात झोपले होते. मध्यरात्र झाल्यावर सदर मुलगी झोपेत असताना तिचे वडील दारुच्या नशेत तिच्याजवळ आले व तिच्याशी लगट करू लागले. त्याचवेळी सदर मुलीला जाग आल्याने तिने वडिलांना विरोध केला. मात्र, वडिलांनी तिला दम देऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केले.
यानंतर मुलीला त्रास होऊ लागल्याने तिने झालेला प्रकार आई व भावाला सांगितला. त्यांनी घटनेचा जाब विचारला असता, आरोपीने याबाबत कुणालाही सांगितले, तर जीवे मारण्याची धमकी सर्वांना दिली. त्यामुळे झालेला प्रकार त्यांनी भीतीपोटी कुणालाही सांगितला नाही.कालांतराने मुलीच्या पोटात दुखू लागल्याने डॉक्टरांकडे नेल्यानंतर ती सात महिन्यांची गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.