जनावरे चोरांची टोळी पकडल्याने शेतकऱ्यांना दिलासा

बीड दि.१३ – जनावरे चोरून त्यांची विविध कारणासाठी विक्री करणाऱ्या चौघांना बेड्या ठोकण्यात अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या विशेष पथकास यश आले आहे. यामुळे सततच्या जनावरे चोरीमुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

रविवारी (दि. ८) रात्री शिरूर तालुक्यातील तागडगाव येथील मथुराबाई सिरसाट यांच्या गोठ्यातून दोन गाई आणि दोन वासरे चोरीला गेले होते. या व्यतिरिक्त जिल्ह्यातील धारूर, तलवडा, शिरूर, नेकनूर, गेवराई या भागातूनही जनावरे चोरी गेल्याच्या घटना घडल्या होत्या. सततच्या घटनांमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान,काल रात्री उशिरा जनावरे चोरांची टोळी मादळमोही येथे आली असल्याची गुप्त माहिती अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या विशेष पथकास प्राप्त झाली होती. या आधारे पथकाने तातडीने कारवाई करत मादळमोही परिसरातून आकाश नारायण अलगुडे, रमेश गिले, सादेक अजीज कुरेशी आणि प्रकाश कचरू मोहिते या चार चोरट्यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून जनावरे चोरीसाठी वापरण्यात येणारी दोन वाहने आणि शिरूर तालुक्यातील चोरीतील दोन गाई आणि दोन वासरे जप्त करून ती शिरूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली.

हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर आणि अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील फौजदार वाघमारे, पोलीस कर्मचारी केंद्रे, नागरगोजे, सानप आणि पवार यांनी पार पडली. या कारवाईचे शेतकरी वर्गातून स्वागत करण्यात येत आहे.

१६ जनावरे कत्तलीसाठी औरंगाबादला दिली

दरम्यान, पोलिसी खाक्या दाखविताच चारही आरोपींनी जिल्ह्यात विविध ठिकाणी जनावरे चोरी केल्याचे सांगितले. अलगुडे आणि गिले या दोघांनी आतापर्यंत १६ जनावरांची चोरी करून ती सादेक अजीजच्या मार्फत औरंगाबाद येथे कत्तलीसाठी पाठविली आहेत. तर, प्रकाश मोहिते याने चोरलेल्या जनावरांची इतरत्र विक्री केली असल्याचे चौकशीत समोर आले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email