कल्याण  : चेन स्नॅचिंग आणि मोटारसायकल चोरी करणाऱ्या 5 इराणी आरोपींच्या कल्याण पोलिसांच्या अँटी रॉबरी स्कॉडने मुसक्या आवळल्या आहेत. विशेष म्हणजे यामध्ये 2 महिला आरोपींचाही समावेश असून पोलिसांनी या आरोपींकडून 17 तोळे सोने आणि 4 मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत.

कल्याण डोंबिवलीत विविध ठिकाणी पुन्हा एकदा सोनसाखळी चोरीच्या घटनांनी डोके वर काढलं असून या आरोपींना जरेबंद करण्याचे आवाहन पोलिसांसमोर होते. त्याचा तपास करीत असताना सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या कासीम इराणी आणि हुसेन उर्फ गझनी इराणी या दोघांची नावे पुढे आली. त्यांचा ताबा घेऊन चौकशी केली असता फातिमा संजय इराणी, फराह हाफीज खान, अली हसन जाफरी, मुस्तफा सैय्यद आणि एका अल्पवयीन आरोपीचा यात समावेश असल्याचे निष्पन्न झाले. हे सर्व जण सोनसाखळी चोरीचे गुन्हे करून त्यांची विक्री करीत होते. या सर्वांनी कल्याण आणि डोंबिवली शहरातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत चेन स्नॅचिंगच्या 10 आणि मोटारसायकल चोरीचे 4 गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांनी दिली. या सर्व आरोपींकडून 3 लाख 21 हजार रुपये किंमतीचे 17 तोळे सोने आणि 4 मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत.
ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय कांबळे, अँटी रॉबरी स्कॉडचे निरीक्षक श्रीकांत धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हेमंत ढोले, अविनाश पाळदे यांच्या पथकाने केली.