चीनला बिगर बासमती तांदळाची निर्यात करायला आणखी पाच भात गिरण्यांना परवानगी
नवी दिल्ली, दि.२५ – भारतातून चीनला बिगर बासमती तांदळाची निर्यात करायला आणखी पाच भात गिरण्यांना परवानगी मिळाली आहे. त्यामुळे या भात गिरण्यांची संख्या 24 झाली आहे. चीनला 100 टन बिगर बासमती तांदळाची निर्यात या वर्षाच्या सप्टेंबरमध्ये नागपूरहून प्रथम केली गेली. मे महिन्यामध्ये चीनमधल्या अधिकाऱ्यांनी चीनसाठी बिगर बासमती तांदळाची निर्यात करण्याच्या दृष्टीने पाहणी केली आणि 19 गिरण्यांची यासाठी नोंदणी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जून महिन्यातल्या चीन भेटी दरम्यान चीनला भारतातून तांदूळ निर्यात करण्यासंदर्भातल्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. या तांदुळाच्या जातीमध्ये बिगर बासमती तांदळाचा समावेश करण्यासाठी सुधारणा करण्यात आली होती.
चीन हा जगातला तांदळाचा सर्वात मोठा उत्पादक आणि आयातदारही आहे. यामुळे भारताला चीनमध्ये तांदळाची निर्यात करायला मोठा वाव आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारताची तांदळाची एकूण निर्यात 12.7 मेट्रिक टन झाली होती. याआधी ही संख्या 10.8 मेट्रिक टन होती. वाढती वित्तीय तूट भरुन काढण्यासाठी चीनला तांदूळ आणि साखरेसारख्या कृषी उत्पादनांची निर्यात करण्यासाठी भारत उत्सूक आहे.