चार महिन्याच्या चिमुकलीला मारुन टाकणाऱ्या बापाला जन्मठेप
नगर – अकोले तालुक्यातील वारंघुशी येथील जन्मदात्याने आपल्या चार महिन्याची चिमुकली ईश्वरी हिला जमिनीवर आपटून मारुन टाकल्याची घटना दि.१८ जून २०१५ रोजी घडली होती. त्या घटनेचा निकाल संगमनेरचे अतिरिक्त
जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधिश संजीव शर्मा यांनी सुनावला असून आरोपी किसन चंदर भवारी (रा.वारंघुशी, ता.अकोले) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, अकोले तालुक्यातील वारंघुशी येथील रहिवाशी असलेला किसन भवारी याने पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरुन स्वत:च्या चार महिन्याच्या ईश्वरी या मुलीस झोक्यातून काढून तिचे पाय धरुन जमिनीवर आपटत ठार मारले. तसेच पत्नी कविता हिची मावशी मिनाबाई भवारी हिस कुऱ्हाडीने मारहाण केली.
याबाबत पत्नी कविता हिने दिलेल्या फिर्यादीवरुन राजूर पोलिस ठाण्यात किसन भवारी याच्या विरोधात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी त्याच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली होती. या घटनेचा अधिक तपास
तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक आर.ए.पाटील यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
या खून खटल्याची सुनावणी संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधिश संजीव शर्मा यांच्यासमोर झाली. यावेळी सरकारी वकील संजय वाकचौरे यांनी सरकारी पक्षाच्या वतीने आठ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. या खटल्यातील सबळ पुरावे सादर केल्यामुळे न्यायाधिश संजीव शर्मा यांनी आरोपी किसन भवारी यास खूनाच्या खटल्याखाली जन्मठेपेची व २५ हजार रुपयांची शिक्षा सुनावली.दंड न भरल्यास सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. तसेच आयपीसी
कलम ३२४ या कलमाखाली १० हजार रुपये दंडाची शिक्षा दंड न भरल्यास आणखी सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. यावेळी पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार पी.एच.खोसे, शकील इनामदार, सिकंदर शेख यांनी मदत केली.