चंद्रपूर सैनिक शाळेचे काम वेगाने पूर्ण करावे – अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर सैनिक शाळेचे काम वेगाने पूर्ण करावे – अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर सैनिक शाळेत २०१९ ला पहिली बॅच प्रवेश घेऊ शकेल या पद्धतीने शाळेचे काम वेगाने पूर्ण करावे, असे आदेश काल चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृहात यासंबंधी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीत सैनिक शाळेचा विकास आराखडा सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर सादर करण्यात आला. यावेळी शालेय शिक्षण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

चंद्रपूरची सैनिक शाळा ही भारतातील उत्तम सैनिक शाळा व्हावी यासाठी तिथे करण्यात येणारे काम आणि राबविण्यात येणाऱ्या संकल्पना उत्कृष्ट आणि दर्जेदार असाव्यात अशा सूचना देऊन सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, या शाळेसाठी १२३ एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या जागेचा शाळेच्या इमारतीसाठी उपयोग करून घेतांना तो कल्पकतेने तसेच सर्व आवश्यक गरजांचा विचार करून केला जावा. शाळेची इमारत, प्रशासकीय इमारत, विद्यार्थ्यांचे वसतिगृहे, विद्यार्थ्यांसाठी क्रीडा हॉल्स, मैदाने, स्वीमिंग टँक, त्यांची भोजनाची व्यवस्था, शैक्षणिक तसेच इतर कर्मचारी वर्गाची राहण्याची व्यवस्था, परेड ग्राऊंड, हॉर्स रायडिंगची जागा, घोड्यांच्या पागा, वाहनतळ, यासगळ्या व्यवस्था या परस्पर संलग्न आणि सोयीच्या असाव्यात. येथे युनिक झाडांचे उद्यान तयार केले जावे, बांबू रोपांची लागवड सुनियोजित पद्धतीने केली जावी, वीज वापराच्या दृष्टीने ही शाळा स्वंयपूर्ण होऊ शकते का याचा अभ्यास करावा, यासंबंधीची अधिक माहिती मेडा कडून प्राप्त करून घेण्यात यावी. शाळेमध्ये एक महिन्याचे छोटे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जावेत. शाळेमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था करण्यात यावी. मिल्ट्री म्युझियम, विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठीची दुकाने,याचीही येथे व्यवस्था असावी असेही ते यावेळी म्हणाले.

चंद्रपूर येथे सैनिक शाळा सुरु करण्याचा निर्णय एप्रिल २०१५ मधील मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. सातारा सैनिक शाळेच्या धर्तीवर चंद्रपूर येथे सैनिक शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावास केंद्र शासनाकडून मान्यता देण्यात आल्यानंतर यासाठी एकूण सुमारे ३०९ कोटी रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाकडून यावेळी देण्यात आली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email