ग्रामीण पट्ट्यातील दूरसंचार सेवा सुधारण्यासाठी बीएसएनएल पुरवणार हॉटस्पॉट सुविधा

श्रीराम कांदु 

ठाणे : नेवाळी ते श्री मलंगगड पट्ट्यात बीएसएनएलने हॉटस्पॉट सुविधा वितरीत केल्यास ही गावे वायफायने जोडण्यासोबतच उत्तम नेटवर्क सेवा पुरवणे शक्य आहे, त्यासाठी तातडीने पावले उचलण्याच्या सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बीएसएनएलचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सोलंकी यांना शुक्रवारी केल्या. याला सकारात्मक प्रतिसाद देत यावर लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

बीएसएनएलचे भारत जोडो अभियान प्रत्येक गावखेड्यापर्यंत पोहोचणे आवश्यक असून त्यासाठी नेवाळी, श्री मलंगगड, शहापूर, मुरबाड, जव्हार आदी भागात बीएसएनएलने टॉवर उभारण्याची आवश्यकता खा. डॉ. शिंदे यांनी प्रतिपादित केली. मात्र, अनेक तांत्रिक अडचणींमुळे ते शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर त्यावर हॉटस्पॉट सुविधा पुरवण्याचा तोडगा डॉ. शिंदे यांनी सुचवला.

बीएसएनएलच्या कामांचा आढावा आणि पुढील वाटचाल यासाठी दूरसंचार सल्लागार समितीची बैठक पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांच्या अध्यक्षतेखाली कल्याण येथील बीएसएनएल निगम कार्यालयात पार पडली. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कपिल पाटील, आमदार डॉ. बालाजी किणीकर, बीएसएनएलचे उपमहाव्यवस्थापक श्री. कुलकर्णी, उपमहाव्यवस्थापक (कल्याण/भिवंडी) श्री. ठाकरे, उपमहाव्यवस्थापक श्रीमती भाटीया आदी अधिकारी उपस्थित होते. बीएसएनएलच्या कूर्मगतीने सुरू असलेल्या कारभारावर यावेळी सर्व सल्लागार समिती सदस्यांनी ताशेरे ओढले. २०१४ पासून माझ्या घरातील बीएसएनएलचा लँडलाइन बंद असल्याचे सांगत बैठकीचे अध्यक्ष खा. चिंतामण वनगा यांनी बीएसएनएलला घराचा आहेर दिला.

शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील बीएसएनएलची सेवा डबघाईला आली असून याचा फायदा इतर प्रतिस्पर्धी कंपन्या उचलण्याची भीती यावेळी खा. डॉ. शिंदे यांनी व्यक्त केली. यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर, शिवसेना गटनेता रमेश जाधव, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, नगरसेवक दीपेश म्हात्रे, निखील वाळेकर, दशरथ घाडीगावकर, महिला संघटक कविता गावंड आदी उपस्थित होते.       

श्री मलंगगड भागामध्ये २००७ साली बीएसएनएलने लाइन टाकण्यास सुरुवात केली होती. मात्र, खर्च वाढल्यामुळे २००९ मध्ये हे काम बंद करण्यात आले. याशिवाय अंबरनाथ येथे स्वत:ची जागा असून देखील बीएसएनएलने दुसऱ्याच्या जागेत कार्यालय थाटले आहे आणि त्याचे महिन्याकाठी १ लाख रुपये भाडे देखील बीएसएनएल भरते आहे बीएसएनएलचा असा भोंगळ कारभार सर्वच ठिकाणी सुरू असल्याची बाब खा. डॉ. शिंदे यांनी बैठकीत मांडली. सर्वच सरकारी कार्यालये, पोस्ट ऑफिसेस तसेच, बँकांमध्ये बीएसएनएलचे नेटवर्क वापरण्यात येत असून नेटवर्क धीम्या गतीने सुरु असण्याचा मनस्ताप विद्यार्थी, महिला, नोकरदार आणि वयोवृद्ध अशा सर्वच स्तरातील नागरिकांना विनाकारण सोसावा लागत असल्याचे खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email