गोव्याची दारू उंची मद्य म्हणून विकणा-या दोघांना अटक
कल्याण गुन्हे शाखेनं उघड केला ‘दारूचा गोलमाल’….
गोव्याची दारू उंची मद्य म्हणून विकणा-या दोघांना अटक
३८० खोके दारुसह साडेचौदा लाखांचा मुद्देमाल जप्त
डोंबिवली : गोव्याची कमी प्रतीची दारू महाराष्ट्रात आणून इकडे उंची मद्य म्हणून विकणा-या दोघांना कल्याण गुन्हे शाखेनं अटक केलीये. या दोघांकडून तब्बल ३८० खोके दारू जप्त करण्यात आलीये. रंजन शेट्टी आणि हिरामण म्हात्रे अशी या दोघांची नावं असून डोंबिवली-शिळफाटा रोडवर ते हा धंदा करायचे. गोव्याहून ८० ते ९० रुपयांना मिळणा-या हलक्या प्रतीच्या दारूच्या बाटल्या मागवून त्यातली दारू उंची मद्याच्या बाटलीत भरायची आणि त्यांना नवीन पॅकिंगची झाकणं लावून विकायची, अशी या दोघांची कार्यपद्धत होती. यासाठी भंगारवाल्यांकडून ते उंची मद्याच्या बाटल्या विकत घ्यायचे. एका कंटेनरमध्ये ते हा गोरखधंदा करायचे. विशेष म्हणजे ही दारू ते बाजारभावाच्या अर्ध्या किंमतीत विकत असल्यानं त्यांच्याकडून याच भागातले आगरी बांधव हळद अथवा तत्सम कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात दारू विकत घ्यायचे, अशी माहिती पोलिसांनी दिली. याबाबत कल्याण गुन्हे शाखेला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी धाड टाकत हा धंदा उध्वस्त केला. यावेळी कंटेनर, दोन कार, दारूचे ३८० बॉक्स आणि उंची मद्याच्या बाटल्यांची ८ हजार नवीन झाकणं पोलिसांनी जप्त केलीयेत. या सगळ्याची किंमत साडेचौदा लाखांच्या घरात आहे