गोमांसाची वाहतूक करणाऱ्या दोघांना कल्याणात अटक,1500 किलो गोमांसासह टेम्पो जप्त
( श्रीराम कांदु )
डोंबिवली :कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांच्या सतर्कतेमुळे गोमांसाची तस्करी करणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात यश आले आहे. हे दोघेही पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील रहिवासी असून त्यांनी टेम्पोमध्ये1 हजार 500 किलो वजनाचे मांस कोठून आणले व कुठे वितरीत करण्यात येणार होते, याची पोलिस सखोल चौकशी करत आहेत.
मंगळवारी पहाटेच्या सुमारास कल्याण पूर्वेतील संतोषी माता नगर परिसरात गस्तीवर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक राम दिवेकर यांना एका टेम्पोत वाहनात मांस असल्याचा संशय आला. त्यांनी हा टेम्पो अडवून त्यातील दोघांना ताब्यात घेतले असता या टेम्पोमध्ये धक्कादायक माल आढळून आला. या टेम्पोची तपासणी केली असता त्यात बर्फात झाकलेले मांस असल्याचे गस्ती पथकाच्या निदर्शनास आले. पोलिसांनी टेम्पो क्र. एम एच 04 / जी आर / 5721 ताब्यात घेऊन महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात आणला. पशुवैद्यकीय आधिकाऱ्यांना पाचारण करून मांसाची तपासणी केली असता ते गोमांस असल्याचे निष्पन्न झाले. या दुकलीकडून तब्बल 1 हजार 500 किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे. या संदर्भात ताब्यात घेतलेल्या आखलाख आसिफ शेख (25), इम्रान हुसेन कुरेशी (32) दोघेही राहणार जुन्नर, यांच्या विरोधात महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा 5, 5 (अ), 5 (क), 9 (ब), तसेच मुंबई प्रांतिक आधिनिय 335 प्रमाणे आणि भारतीय दंड विधान 429 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण न्यायालयाने अटक आरोपींना 11 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.