गुटखा खाऊन थुंकल्याचा राग मनात ठेवून केला खून
धारावी शेठवाडी परिसरात राहणारा अल्पवयीन मुलगा रस्त्यालगत उभा असताना रईस गुटखा खाऊन थुंकला. त्याची थुंकी कपड्यावर उडाल्याने या मुलाचे रईसशी जोरदार भांडण झाले. रईस गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याचा राग अनावर झाला. त्याने लागलीच जवळील बांबू उचलून या मुलाला बेदम चोप देऊन पळवून लावले. त्यानंतर दोन दिवसांनी त्या मुलाने रईसवर चाकूचे वार केले. स्थानिक रहिवाशांनी रईसला शिव रुग्णालयात दाखल केले. मात्र दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
याची माहिती मिळताच धारावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. तोवर हल्लेखोर मुलगा शाहूनगर पोलीस ठाण्यात हजर झाला होता. बांबूने मारझोड केल्याचा राग मनात ठेवून हा मुलगा गेल्या दोन दिवसांपासून संधीची वाट पाहात होता. शनिवारी दुपारी रईस हा मोसंबी ज्यूस विकणार्या टपरी समोर एकटाच उभा होता. तेंव्हा या मुलाने धावत जाऊन आपल्याजवळील चाकू काढून रईसच्या पोटात, चेहर्यावर, गळ्यावर वार केले. त्याला प्रतिकार करण्याआधीच रईस रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. तेंव्हा अल्पवयीन मुलाने घटनास्थळावरून पोबारा केला.