गांजाची तस्करी करणारा आरोपी गजाआड
(श्रीराम कांदु)
डोंबिवली : बेकायदेशीररित्या गांजा आणून त्याची विक्री करणाऱ्या महेश चंद्रकांत चौधरी (२० रा. टंडनरोड दत्तनगर) या गांजा तस्करास सांगर्ली रोडवरील आईस फॅक्टरी येथून मंगळवारी संध्याकाळी अटक केली.
महाविद्यालयीन व शाळकरी मुलांना चरस, गांजा, अफिम यासारख्या अंमली पदार्थांची सवय लावून त्यांना नशेखोरी प्रवृतीला पाठबळ देण्याच्या घटना शहरात सर्रास होत आहेत. याबाबत तक्रारी पोलिसांकडे पालकवर्ग शाळा प्रशासन करीत होते. या वाढत्या अंमली पदार्थ घटनेला आळा घालण्यासाठी पोलिसांनी शाळा व महाविद्यालयीन परिसरात विशेष पथक तयार करून नाकाबंदी मोहीम हाती घेतली. अशाच एका मोहिमेत मंगळवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास महेश हा रंगेहाथ कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या जाळ्यात सापडला. पोलिसांनी त्याच्याकडून निळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीतून साडेचार किलो हिरवट रंगाचा ८२ हजाराचा गांजा, गुन्ह्यात वापरलेली अडीच लाख रुपयांची टाटा कार, एअर पिस्टल, मोबाईल आणि रोकड असा सुमारे ३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कल्याण न्यायालयात महेश याला हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Please follow and like us: