खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिवा स्थानकात स्वखर्चाने दिली रुग्णवाहिका

(म.विजय)

अपघातानंतर गोल्डन अवरमध्ये मिळणार तातडीने उपचार

 

ठाणे : रेल्वे मार्गावरील वाढते अपघात लक्षात घेता अपघात झाल्यानंतर तातडीने उपचार मिळावेत, यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी स्वखर्चाने दिवा रेल्वे स्थानकासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. प्रशासकीय बाबींमुळे आपत्कालीन वैद्यकीय कक्ष, रुग्णवाहिका आदी बाबींना विलंब होत असल्यामुळे खा. डॉ. शिंदे यांनी तातडीची बाब म्हणून स्वखर्चाने ही रुग्णवाहिका प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिली आहे.

ठाण्याच्या पुढील उपनगरी रेल्वे मार्गावर अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे सर्व स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष असावेत, तसेच २४ तास रुग्णवाहिका उपलब्ध असावी, यासाठी खा. डॉ. शिंदे गेली साडेचार वर्षे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यातून कल्याण, डोंबिवली, मुंब्रा या स्थानकांमध्ये आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू झाले आहेत. कळवा येथेही लवकरच असा कक्ष सुरू होणार आहे. परंतु, दिवा येथील प्रवाशांची वाढती संख्या आणि रेल्वेचा लाल फितीचा कारभार बघून अखेर तातडीची बाब म्हणून खा. डॉ. शिंदे यांनी स्वखर्चाने दिवा रेल्वे स्थानकात रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.

बुधवारी खा. डॉ. शिंदे यांच्याच हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी आमदार सुभाष भोईर, शिवसेना उपनेते दशरथ पाटील, ठाणे महापालिकेचे उपमहापौर रमाकांत मढवी, नगरसेवक शैलेश पाटील, दिवा स्थानकाचे मॅनेजर श्रीवास्तव, शिवसेनेचे अन्य नगरसेवक, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email