खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने दिव्यांग सहाय्य शिबीर १३ ते १५ ऑक्टोबर दरम्यान
( श्रीकांत शिंदे )
डोंबिवली :- दि. १० (श्रीराम कांदू ) कल्याण लोकसभा मतदार संघातील दिव्यांगांसाठी मदतीचा हात पुढे करत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने १३ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान दिव्यांग सहाय्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यासाठी केंद्र शासन आणि भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, कानपूर कंपनीचे विशेष सहकार्य लाभणार आहे. या शिबिरात दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम अवयव व साधने वाटपासाठी नाव नोंदणी व मोजमाप घेण्यात येणार असून महिन्याभरात पुन्हा शिबीर आयोजित करून प्रत्यक्ष लाभार्थींना त्याचे वाटप करण्यात येणार आहे.
यामध्ये कृत्रिम हात, पाय तसेच, व्हीलचेअर्स, तीनचाकी स्वयंचलीत सायकल्स, बायसिकल्स, कानाचे मशीन्स, अंधांसाठी ब्रेल लिपी मशीन्स आदींचा समावेश असणार आहे. या शिबिराचा शुभारंभ १३ ऑक्टोबर रोजी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अंबरनाथ येथे होणार असून कल्याण लोकसभा मतदार संघात तीन दिवसात ६ ठिकाणी हे शिबीर होणार आहे. दिनांक १३ ऑक्टोबर रोजी अंबरनाथ पश्चिम येथील ‘स्टार बँक्वेट हॉल’, बिग सिनेमा, कल्याण-बदलापूर रोड येथे आणि उल्हासनगर क्र. ४ येथील ‘बाबा प्राईम हॉल’, सम्राट बिस्कीट समोर,इंडस्ट्रीअल परिसर येथे होणार आहे. दिनांक १४ ऑक्टोबर २०१७ रोजी डोंबिवली पूर्व येथील ‘ठाकूर हॉल’, टंडन रोड आणि कल्याण पूर्व येथील ‘कर्पे हॉल’, कोळसेवाडी येथे होणार आहे. दिनांक १५ ऑक्टोबर २०१७ रोजी कल्याण ग्रामीण येथे शिळ रोडवरील ‘खिडकाळेश्वर मंदिर सभागृह’,खिडकाळेश्वर येथे आणि कळवा-मुंब्रा येथील ‘झमझम हॉल’, खडी मशीन रोड, दारूल फलाह मस्जिद जवळ, कौसा-मुंब्रा येथे होणार आहे. या शिबिराला ठाणे येथील धर्मवीर दिव्यांग सेना, उल्हासनगरमधील अपंग सेवा संघ, मुंब्र्याची हमराही एज्युकेशनल चॅरीटेबल ट्रस्ट, अंबरनाथ येथील अपंग सुश्रुषा सेवा संघ, डोंबिवलीतील अपंगालय, ठाणे जिल्हा रुग्णालय, अपंग साधना संघ यांचासहभाग राहणार आहे. या शिबिरासाठी अपंगत्वाचा दाखला (४०%), आधार कार्ड ४ पासपोर्ट साइजछायाचित्रे आणि उत्पन्नाचा दाखला (१ लाखापर्यंत मर्यादा किंवा रेशनकार्ड) ही कागदपत्रे आवश्यक आहेत. या शिबिरात अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी आपला सहभाग नोंदवून याचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा तसेच, या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, कळवा, मुंब्रा, दिवा येथील शिवसेनेच्या शाखांमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले आहे.