खासदार, आमदार, शासकीय अधिकाऱ्यांच्या नावे तिकीट बूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
मुंबई लोहमार्ग पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, मास्टर माईंडला यूपीत ठोकल्या बेड्या
(म.विजय)
हॉलिडे स्पेशल गाड्यांचे ऑनलाईन तिकीट बूक करण्यासाठी खासदार, आमदार, शासकीय अधिकाऱ्यांच्या नावाचे बनावट लेटरहेड तयार करून व्हिआयपी कोट्यातून रेल्वेचे तिकीट बूक करणाऱ्यांचे रॅकेट उघडकीस आले. तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या मास्ट माईंडला पोलिसांनी यूपीत बेड्या ठोकल्या. कारवाई दरम्यान पोलिसांना आरोपीच्या मोबाईलमध्ये 40 ते 50 पीएनआर क्रमांक मिळाले असून, त्यापैकी 10 हून अधिक पीएनआर महाराष्ट्रातील शासकीय अधिकारी, प्रतिष्ठीत व्यक्ती व राजकीय नेतेमंडळींचे आहेत. गेल्या दोन वर्षांपासून आरोपी तिकिटांचा काळाबाजार करत होता. मुंबई लोहमार्ग पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात रेल्वे तिकिटांचे रॅकेट उघडकीस येणार आहे. हाती लागलेल्या आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती मध्य परिमंडळचे उपायुक्त समाधान पवार यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाचे निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याचे नावाने 24 एप्रिल 2018 रोजी मुंबई – वाराणसी हॉलिडे स्पेशल ट्रेनचे वेटिंगचे तिकीट कन्फर्म करण्यावरून सदर काळाबाजार समोर आला. शासकीय अधिकारी निवृत्त झाल्यानंतरही व्हिआयपी कोट्यातील तिकिटासाठी रेल्वे प्रशासनाला फॅक्स आला होता. सदर घटनेची माहिती मिळताच या गुन्ह्याचा छडा लावण्याकरिता लोहमार्ग पोलिसांच्या पथकाची निवड करण्यात आली.
तपासादरम्यान पोलीस पथकांनी तांत्रिक बाजू तपासल्या असता तिकिटांचा काळाबाजार उत्तर प्रदेशातील (यूपी) गाझिपूर येथून ऑनलाईनरीत्या होत असल्याचे उजेडात आले. ही माहिती हाती लागताच क्षणाचाही विलंब न लावता पोलिसांचे पथक गाझिपूरला रवाना झाले. तिकीट बूक करणारा एजंट देवप्रताप सिंह (29) याच्यावर पाळत ठेवून त्याला बेड्या ठोकल्या. मुंबईत आणल्यानंतर सिंह याची कसून चौकशी केली असता तिकिटांचा काळाबाजाराची हकीगत पोलिसांसमोर कथन केली.
व्हीआयपी कोट्यातून तिकीट बूक करण्यासाठी सिंह हा इंटरनेटवरून खासदार, आमदार, शासकीय अधिकाऱ्यांच्या नावे असलेले लेटरहेड डाऊनलोड करायचा. त्या लेटरहेडमध्ये तांत्रिकरीत्या फेरफार करून त्यावर तिकिटांसाठी अर्ज नमूद करायचा. सदर अर्ज फॅक्सद्वारे रेल्वे प्रशासनाला पाठवत होता. गेल्या दोन वर्षांपासून आरोपी देवप्रताप सिंह हा अशा प्रकारे तिकिटांचा काळाबाजार करत होता. या तिकिटांसाठी 1 हजार 200 रुपये ते 2 हजार 400 रुपये स्वीकारत होता.
या गुन्ह्याचा छडा लोहमार्गचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक, मध्य परिमंडळचे उपायुक्त समाधान पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली पोळ, हवालदार धनराज महाजन, साजिद शेख, पोना गणेश मेदगे, पोना राहुल आहिरे, पोना तानाजी भोसले, पोशि सोयब शेख, पोशि महेश झोरे, पोशि जयवंत कुंभार आदी पथकाने उघडकीस आणला.