खड्डे बुजवण्यासाठी पालकमंत्री उतरले रस्त्यावर कायमस्वरुपी खड्डे बुजवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा प्रयोग – एकनाथ शिंदे यांची माहिती

(श्रीराम कांदु)

ठाणे दि.१५ – सततच्या पावसामुळे ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत पडलेले खड्डे बुजवण्यासाठी आज स्वतः पालकमंत्री एकनाथ शिंदे रस्त्यावर उतरले. खड्ड्यांमुळे लोकांचा जीव जात असून संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याचा इशारा श्री. शिंदे यांनी दिला. हद्द कोणाची हे न बघता युद्धपातळीवर खड्डे बुजवण्याचे आदेश त्यांनी महापालिका, एमएमआरडीए आणि एमएसआरडीसीला दिले.

 

खड्डे कायमस्वरुपी बुजवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा प्रयोग ठाणे महापालिका करत आहे. तर खड्ड्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत उच्च दर्जाचे पेव्हर ब्लॉक आणि आरएमसीने खड्डे बुजवण्यात येणार असल्याची माहिती श्री.शिंदे यांनी दिली. ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि शीव-पनवेल महामार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामांची पाहणी श्री. शिंदे यांनी काल केली.

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत गेल्या काही दिवसांत खड्ड्यांमुळे अपघात होऊन ५ बळी गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शिंदे यांनी युद्धपातळीवर खड्डे बुजवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी काल संबंधित अधिकाऱ्यांसह या कामांची पाहणी केली. खड्डे बुजवण्याच्या कामात ढिसाळपणा खपवून घेणार नाही, असा इशारा देत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. पावसाचे कारण सांगू नका, हद्दीचे कारण सांगू नका, युद्धपातळीवर रस्ते बुजवा, अशी सक्त ताकीद त्यांनी यावेळी दिली. खा. डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर विनिता राणे, आयुक्त गोविंद बोडके, एमएसआरडीसीचे सह व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, शहर अभियंते प्रमोद कुलकर्णी, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, प्रकाश पाटील, नगरसेवक विश्वनाथ राणे, कल्याण शहरप्रमुख विश्वनाथ भोईर, महानगर प्रमुख विजय साळवी आदी उपस्थित होते.

रांजणोली नाका, कोन, संतोषी माता मंदिर, रामबाग लेन, शिवाजी चौक, द्वारली, नेवाळी नाका आदी ठिकाणांची पाहणी श्री. शिंदे यांनी केली. गेल्या काही दिवसांत झालेल्या अपघातांच्या जागांचीही पाहणी केली. शिवाजी चौक येथे काँक्रीटच्या रस्त्याला लागून असलेले जुने पेव्हर ब्लॉक काढून १०० मि. मी.चे नवे, मजबूत पेव्हर ब्लॉक टाकून रस्त्याची पातळी समान करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच, एमएमआरडीएचे अतिरिक आयुक्त प्रवीण दराडे यांना दूरध्वनीवरून रांजणोली नाक्यावरील खड्डेही १०० मि. मी.च्या, उच्च क्षमतेच्या पेव्हर ब्लॉकने बुजवण्यास सांगितले.

अधिकाऱ्यांनी रस्त्यांवर फिरून काय परिस्थिती आहे ते बघा, केबिनमध्ये बसून कामे करू नका, हद्दीचे कारण पुढे करू नका, लोकांचा जीव महत्वाचा आहे, असेही श्री. शिंदे यांनी बजावले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email